ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अशीही गुरुपौर्णिमा सणाला आदिवासी संस्कृतीत महत्व; दिवंगत आई-वडिलांची होते पूजा, मटणाचा प्रसाद

मेळघाटात आदिवासी समुदायात आखाडी सणाला फार महत्व आहे. यादिवशी कोरकू जमातीचे लोक मुंडादेवाची पूजा करून प्रत्येक घरी मटणाचा प्रसाद वाटतात.

अमरावती : गुरुपौर्णिमा (Guru Purnima) अर्थात ‘आखाडी पौर्णिमा’ हा आदिवासी संस्कृतीत वर्षातला पहिला सण मानतात. मेळघाटात आदिवासी समुदायात आखाडी सणाला फार महत्व आहे. आखाडी पौर्णिमानिमित्त दिवंगत आई-वडिलांची पूजा केली जाते. सकाळी गोड शिरा आणि भाजीचं जेवण बनवलं जातं आणि रात्री संपूर्ण गावात मटणाचा प्रसाद वाटला जातो. आदिवासी समुदायातील आखाडी सणासंदर्भात “खरा संवाद”चा स्पेशल रिपोर्ट.

मुंडादेवाची केली जाते पूजा : मेळघाटातील कोरकू जमातीमध्ये घरातील आई-वडील दगावल्यावर त्यांच्या नावानं गावाबाहेर नदीच्या परिसरात वर्षभरात मुंडादेवाची स्थापना केली जाते. सागवानच्या लाकडात विशिष्ट आकारात हे मुंडादेव तयार केले जातात. या मुंडदेबासोबत मृत व्यक्तींची मूर्ती लाकडात कोरली जाते. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणात उभारलेल्या या मुंडादेवाची आखाडी निमित्त पूजा केली जाते. या मुंडदेवाला पाच पुरींसह गोड शिऱ्याचा नैवेद्य दिला जातो. पाच दिवे देखील मुंडादेवासमोर लावले जातात, असं मनभंग गावातील रहिवासी चंचू सावलकर यांनी ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना सांगितलं. तर “आमचे आई-वडील आमच्या मुलांच्या पोटी जन्मला यावेत अशी प्रार्थना आम्ही आखाडी पुजेच्यानिमित्तानं करतो”, असं चंचू सावलकर म्हणाले.

वर्गणी काढून आणला बकरा : गावात असणारे ग्रामदैवत आणि आखाडी देवाची पूजा ही गावातील कुटुंब वैयक्तिक स्वरूपात दुपारी १२ वाजता करतात. दुपारी चारनंतर ग्रामदेवतेच्या सामुदायिक पूजेची तयारी सुरू होते. आखाडी पौर्णिमेला गावातील प्रत्येक घरातून दीडशे ते दोनशे रुपयांची वर्गणी घेतली जाते. वर्गणीच्या पैशातून बकरा खरेदी केला जातो. या बकऱ्याला गावापासून काही अंतरावर उघड्यावर असणाऱ्या देवापर्यंत वाजत गाजत नेलं जातं. गावाला सुरक्षित आणि समाधानी ठेवावं यासाठी देवाची पूजा करून बकऱ्याचा बळी दिला जातो. देवाजवळ बकऱ्याचा बळी दिल्यावर, त्या बकऱ्याचं मटण प्रसाद स्वरुपात प्रत्येकाच्या घरी दिलं जातं, अशी माहिती जैतादेही येथील रहिवासी विशाल बेठे यांनी “खरा संवाद” शी बोलताना दिली.

 

 

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.