ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

आयकर नोटीस प्रकरण : ‘त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आम्ही वेळ वाढवून मागितला’ : मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं त्यांनी आज माध्यमांना सांगितल्यानं खळबळ उडाली. यावर त्यांनी नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याचं स्पष्ट केलं.

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करण्यात आला होता. आता संजय शिरसाट यांनी आयकर नोटीस आणि दबावाच्या दाव्याला उत्तर दिलं आहे. “मला नोटीसला उत्तर देण्याचं सांगण्यात आलं आहे. यावर मी वेळ मागितला असून आम्ही या नोटीसला नक्की उत्तर देऊ असं, संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

मला देखील नोटीस आली आहे : याप्रकरणी माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “आयकर विभाग सर्वांची चौकशी करतो. राजकीय पुढाऱ्यांना नोटीस येत नाहीत, असं अनेकांना वाटते. मात्र नोटीस आम्हालाही येतात. मला देखील नोटीस आली आहे. आणि आम्ही त्याचं योग्य ते उत्तर देणार आहोत. त्या नोटिशीला आमच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. सरकार सरकारचं काम करत आहे. यंत्रणा यंत्रणांचं काम करत आहेत. माझ्यावर कोणत्याही प्रकरचा दबाव नाही. आम्हाला आता आयकर विभागाला उत्तर द्यावं लागणार आहे. मी वेळ मागितला आहे आणि आम्ही उत्तर देऊ. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जाऊ,” अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

नोटीस पाठवणं आयकर विभागाचं काम : संजय शिरसाट पुढं म्हणाले की, “ही काही राजकीय बाब नाही आणि कोणीही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत नाही. मी असं म्हणणार नाही, की शिवसेनेवर दबाव आणला जात आहे. जर एखाद्याला नोटीस मिळाली, तर याचा अर्थ एजन्सी आपलं काम करत आहे. नोटीस पाठवणं हे आयकर विभागाचं काम आहे आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आयकर विभागानं जारी केलेल्या नोटिसांना आपण उत्तर दिलं पाहिजे,” असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाठली थेट दिल्ली : मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस आलेली असतानाच दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागाची नोटीस आल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठल्याच्या चर्चा सध्या विधान भवनात रंगल्या आहेत. मात्र, श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाच्या नोटीस बाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.