ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट पोषण आहारावरुन काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार हे विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मांडले जाणार आहे. काल (गुरुवारी) विधान सभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक पास करण्यात आले. दरम्यान, आज राज्यातील विविध प्रश्नारुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर राज्यातील अंगणवाड्यांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट पोषण आहारावरुन काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार हे विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

मिलेट बारमध्ये आळ्या सापडल्या : “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बारमध्ये आळ्या सापडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी हा खेळण्याचा प्रकार आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसंच “एफडीएनं तपासणी न केल्यामुळं हा प्रकार घडला आहे. मुळात याचा पुरवठा झाला कसा?, ” असा सवाल देखिल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

 

भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी : “पनवेलमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यामध्ये गर्भवती माता आणि लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आहे. आहाराचे पाकीट उघडताच त्यात घाण वास येतो. त्यात मुंग्या असतात. असा पोषण आहार घरी न आणलेला बरा, असं लाभार्थिंना वाटतं. त्यामुळं पोषण आहारात असा भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी. तसंच त्यांना काळ्या यादीत टाकावं,” अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, “हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि याची शासनानं नोंद घेऊन कारवाई करावी,” असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.