वेडसर महिलेचं आयुष्य पुन्हा फुललं… पोलीस आणि एनजीओनं दाखवली माणुसकी, पती-पत्नी अन् दोन चिमुकल्या मुलींची 11 महिन्यांनी झाली भेट
वर्षभरापूर्वी एक महिला बिहारमधून हरवली आणि नांदेडमध्ये आली. वेडसर असलेल्या महिलेला नांदेड पोलीस आणि रायगडच्या एका एनजीओनं सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन केलं आहे.

नांदेड : थोडीशी दया, सहानुभूती आणि वेळ दिला तर एखाद्याचं आयुष्य कसं बदलू शकतं, हे या घटनेनं सिद्ध करून दाखवलं आहे. नांदेड पोलीस आणि कर्जतच्या एका एनजीओनं समाजात माणुसकी अजूनही शिल्लक आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. या दोघांनी संकटात सापडलेल्या एका अनोळखी वेडसर महिलेला मदतीचा हात दिला. तिचं आयुष्य पूर्ववत करण्यासाठी धडपड केली. ही घटना केवळ भावनिकच नाही, तर समाजाला सकारात्मक संदेश देणारी आहे.
खरं तर, एक महिला दोन चिमुकल्या मुलींसह बिहारच्या चंपारण जिल्ह्यातून हरवली आणि थेट नांदेडमध्ये आली. नांदेडमध्ये आल्यावर तिच्या दोन्ही मुलीदेखील हरवल्या. यानंतर 11 महिन्यांचा काळ लोटला. चित्रपटात शोभेल अशा या घटनेत पुढे काय घडलं? वेडसर महिलेला तिच्या दोन मुली आणि पती कसा भेटला? हे आपण इथं सविस्तर जाणून घेणार आहोत.
संपूर्ण घटना काय? – सुमारे एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक महिला बिहारमधून माहेरी रक्षाबंधनासाठी जाते म्हणून दोन लहान मुलींना घेऊन अचानक बेपत्ता झाली आणि थेट नांदेड शहरात आली. मानसिक अस्वस्थतेमुळे ती कोणालाही काही सांगू शकत नव्हती. तिच्यासोबत 5 वर्षांची एक आणि 3 महिन्यांची एक अशा दोन मुली होत्या. पण काही दिवसांतच या दोन्ही मुलीदेखील तिच्याजवळून हरवल्या. वेडसर असलेली ही महिला अन्न आणि आधारावाचून नांदेडच्या रस्त्यांवर भटकत होती. पण एकेदिवशी नांदेड पोलिसांच्या सतर्कतेमुळं ही महिला त्यांच्या नजरेस पडली. तिची अवस्था पाहून पोलिसांनी तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथं तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू झाले. एका सामाजिक संस्थेच्या (NGO) मदतीनं तिच्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले आणि हळूहळू ती वेडसरपणातून बाहेर यायला लागली. उपचारांनंतर महिलेला तिची ओळख सांगता आली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणि NGO नं तिच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. या प्रयत्नांना यश आलं आणि तिच्या हरवलेल्या दोन्ही मुली (5 वर्षांची आणि 3 महिन्यांची) नांदेडच्या एका शिशुगृहात सापडल्या. यात सर्वाधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे एनजीओ आणि पोलिसांना महिलेच्या पतीलादेखील शोधून काढण्यात यश आलं. पती नांदेडमध्ये आला आणि कुटुंबाला घेऊन बिहारच्या दिशेनं रवाना झाला.
नांदेड पोलीस आणि श्रद्धा फाऊंडेशनचं कौतुकास्पद कार्य : या घटनेतील महिला बेपत्ता झाल्यानंतर पतीनं तिचा सर्वत्र शोध घेतला. पण ना पत्नी भेटली ना मुली. महिला नांदेडला पोहोचली होती. इथं पोहोचल्यावर तिच्याजवळून दोन्ही मुली हरवल्या. या कारणानं महिलेचा वेडसरपणा अधिक उग्र झाला. नांदेड पोलिसांनी तिला आधी शासकीय रुग्णालय आणि पुढे सप्टेंबर 2024 मध्ये पुण्यातील येरवडा इथं मानसोपचार रुग्णालयात दाखल केलं. 8 महिन्यांनी महिलेची तब्येत सुधारल्यावर तिला रायगड येथील एनजीओ श्रद्धा पुनर्वसन केंद्रात दाखल केलं. हळूहळू तिची स्मृती परत यायला लागली. तिच्या दोन मुली हरवल्याचं तिनं सांगितलं. श्रद्धा फाउंडेशननं तत्काळ नांदेडमध्ये शोध घेतला अन् नशिबानं या दोन्ही मुली नांदेडमधील एका शिशुगृहात सापडल्या. सोबतच पोलिसांनी महिलेच्या पतीलाही शोधून काढलं, तो देखील बिहारमधून नांदेडला आला. अशाप्रकारे नांदेड पोलीस आणि एनजीओच्या कौतुकास्पद कार्यामुळे 11 महिन्यांनंतर महिलेला तिच्या दोन्ही मुलींसह तिचा पती मिळाला.
महाराष्ट्रातील लोक देवदूत : या संपूर्ण घटनेबाबत रायगडच्या कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशनचे डॉ. प्रथमेश हेमनाणी यांनी सांगितलं, “महिलेचा पती रोजंदारी करून आपली अन् कुटुंबाची गुजराण करायचा. पण जेव्हापासून त्याची पत्नी अन् मुली हरवल्या तेव्हापासून फक्त त्यांचा शोध हे एकमेव काम त्यानं केलं. नांदेडच्या शिशुगृहात जेव्हा त्यांनी मुलीला पहिलं तेव्हा पती-पत्नीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सुमारे वर्षभरानं त्यांनी आपल्या मुलींना मिठी मारली होती. श्रद्धा फाउंडेशन आणि महाराष्ट्रातील लोकांना ते माणूस नव्हे तर देवदूत समजत आहेत.
महिला दोन मुली आणि पतीसह बिहारला रवाना : खरं तर, या कुटुंबाला एकत्र आणण्यात श्रद्धा फाउंडेशनचं महत्वाचं योगदान आहे. त्यांनीच या महिलेच्या पतीचा शोध लावला अन् तिथून पुढे मुलींचाही शोध लावला. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेतच. पण नांदेड पोलीसही तितक्याच कौतुकास पात्र आहेत. कारण बेवारस सापडलेल्या महिलेला त्यांनी योग्य ठिकाणी पाठवलं. त्यामुळेच एक आई आपल्या दोन्ही मुलींना पुन्हा भेटू शकली. त्यामुळे या सगळ्यांचं लोक कौतुक करत आहेत. नुकतेच हे कुटुंब नांदेडहून रेल्वेनं बिहारच्या दिशेनं रवाना झालं आहे.

