माहूर इथं पावसामुळे सापडली दुर्मीळ चतुर्मुखी गणेश मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
माहूर इथं दुर्मीळ चतुर्मुखी गणेश मूर्ती आढळली आहे. भाविकांनी या मूर्तीची परिसरातील शिव मंदिरात स्थापना केली आहे.

नांदेड : जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर इथं एक मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती चतुर्मुखी गणेशाची असल्याचं सांगितलं जात आहे. भोजंता तलावाच्या शेजारी असलेल्या प्राचीन शिव मंदिराच्या पायथ्याशी ही मूर्ती आढळली. दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहून उपस्थित नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भक्तिभाव निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे.
मूर्ती कशी सापडली? : माहूर पौराणिक शहर असल्यानं इथं नेहमीच खोदकाम करताना पुरातन वस्तू सापडतात. या ठिकाणी पौराणिक मंदिरं, किल्ल्यांसह इतर अनेक ऐतिहासिक वास्तू असल्यानं पर्यटक आकर्षित होत असतात. शहराचं शेवटचं टोक असलेल्या भोजंता तलावाशेजारी एक पुरातण शिव मंदिर आहे. या मंदिरात दररोज भाविक नित्य नियमानं पूजाअर्चा करतात. शनिवारी (19 जुलै) दुपारी दर्शनासाठी आलेले काही भाविक प्रदक्षिणा करीत होते. यावेळी पावसामुळे शिव मंदिराच्या ओट्याखाली असलेल्या जागेत एक दगडवर आलेला दिसला. त्यामुळे काही जणांनी कुतूहलापोटी इथं खोदकाम करून बघितलं, तेव्हा त्यांना ही चतुर्मुखी गणेश मूर्ती आढळून आली.
परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली : गणेशाची मूर्ती सापडल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर भाविकांनी चतुर्मुखी गणेशाची शिव मंदिराच्या ओट्यावर प्राणप्रतिष्ठा करून विधिपूर्वक स्थापना केली. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. सध्या ही मूर्ती दर्शनासाठी खुली असून, या घटनेमुळे माहूर नगरीत धार्मिक आणि आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मूर्तीच्या ऐतिहासिकतेबाबत पुढील अभ्यास आणि तपासणी करण्यासाठी पुरातत्त्व विभागालाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या ठिकाणी गर्दी होत असल्यानं पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी येथील सुरक्षा वाढविली आहे.
चतुर्मुखी गणेश मूर्तीचे विशेष महत्त्वः
- पूर्वमुख (पूर्व दिशेकडे पाहणारे मुख) – हे ज्ञान आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे.
- पश्चिममुख (पश्चिम दिशेकडे पाहणारे मुख) – हे समृद्धी, वैभव आणि संपत्तीचे प्रतीक आहे.
- उत्तरमुख (उत्तर दिशेकडे पाहणारे मुख) – हे शांतता, प्रसन्नता आणि मानसिक स्थैर्याचे प्रतीक मानले जाते.
- दक्षिणमुख (दक्षिण दिशेकडे पाहणारे मुख) – हे शक्ती, सुरक्षा आणि रक्षणाचे प्रतीक आहे.
भारतात अशा मूर्ती फारच दुर्मीळ : भारतात अशा प्रकारच्या मूर्ती फारशा आढळत नाहीत. परंतु रांजणगाव इथं प्राचीन चतुर्मुखी गणपतीची मूर्ती गुप्त कपाटात असल्याचा उल्लेख आहे. काही तांत्रिक साधक किंवा शैव-शाक्त परंपरेतील मंडळांमध्येही मूर्ती ध्यानासाठी वापरली जाते. भारतीय पुराणकथांमध्ये काही ठिकाणी चतुर्मुख गणपतीचं वर्णन ब्रह्मा, विष्णु, महेश आणि गणेश यांचं एकत्रित स्वरूप म्हणून केलं गेलं आहे. प्रत्येक मुख वेगवेगळ्या भावनेचं आणि क्रियेचं प्रतिनिधित्व करते. उदा. ‘क्रोध, करुणा, हसू, शांती’. ध्यानयोगात चतुर्मुखी गणपतीची पूजा ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत लाभदायक मानली जाते.

