“गांधीगिरी नाही, आता भगतसिंगगिरी”, बच्चू कडूंचा सरकारवर ‘प्रहार’, राज्यभरात चक्काजाम
अचलपूर येथे चक्काजाम आंदोलन केलं जात असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमरावती : “शेतकऱ्यांच्या भरवशावर राज्यात सरकार स्थापन झालं. असं असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल हे सरकार घेत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी मागणी आम्ही करतो आहोत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गांधीगिरी केली. मात्र सरकारला जाग आली नाही. आता गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू झाली, ” असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी गुरुवारी राज्यभर प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. अशातच अचलपूर येथे चक्काजाम आंदोलन केलं जात असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तारीख न सांगता मंत्रालयात शिरू : “गुरुकुंज मोझारो येथे अन्नत्याग आंदोलन केलं असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असं आश्वासन या सरकारनं दिलं होतं. आश्वासन दिलं असताना तारीख मात्र सरकारनं अद्यापही जाहीर केली नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्याची तारीख सरकार जाहीर करत नाही. मग आम्ही सुद्धा आता तारीख जाहीर न करता थेट मंत्रालयात शिरू आणि तिथं आंदोलन करू. शेतकरी, मच्छिमार, मेंढपाळ असं सर्व त्या आंदोलनात असतील,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
पीक चांगलं, पण भाव कुठंय? : “राज्यात सर्वत्र पीक चांगलं होतंय. कुठल्याही भागात पीक अडचणींत आहे, अशी परिस्थिती नाही. यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पिकं चांगलं होतंच. आमचा शेतकरी पिकं चांगली घेतोच. मात्र त्यांच्या शेतमालाला भाव कुठे आहेत. माझा गावात दर्जेदार ज्वारी शेतकऱ्यानं घेतली. त्या ज्वारीला 3300 रुपये भाव मिळायला हवा असताना त्या ज्वारीला केवळ 1500 रुपये भाव मिळतो आहे. शेतकऱ्याला अर्ध्या किमतीत माल विकावा. लागला तर तो जगेल कसा. मालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी. सातबारा कोरा असं मुख्यमंत्री स्वतः बोलले होते. तुम्ही आता तुमच्या बोलण्याचा विसर पाडू देऊ नका, ” असं बच्चू कडू म्हणाले.
नागपूरला करणार स्पेशल चक्काजाम : “नागपूरमध्ये आज आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नागपूरच्या भाजपा कार्यालयात बसून पोलीस अधीक्षकानं हे काम केलंय. आम्ही आता नागपूरला स्पेशल चक्काजाम आंदोलन करणार,” असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय.
मोबाईलचा जुगार चालतो, पण ग्रामीण भागात पत्ते खेळणाऱ्यांवर कारवाई : “राज्याचे कृषी मंत्री सभागृहात मोबाईलमध्ये जंगली रमी खेळतात. भारतरत्न असा सन्मान मिळवणारा सचिन तेंडुलकर जंगली रमीची जाहिरात करतो. हे सर्व या सरकारला चालतं आणि ग्रामीण भागात आमचा शेतकरी पत्ते खेळताना दिसला की, त्याच्यावर कारवाई होते. हे चुकीचं आहे,” असं देखील बच्चू कडू म्हणाले.
अचलपूरला जळाले टायर, अमरावतीत एक्सप्रेस हायवे बंद : दरम्यान, अचलपूर-अकोला मार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केलं. अमरावती-नागपूर एक्सप्रेस हायवेवर नांदगाव पेठ टोलनाका येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हा मार्ग सुमारे तासभर बंद केला. याठिकाणी महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांचा बंदोबस्त सकाळी सहा वाजल्यापासून एक्सप्रेस हायवेवर नांदगाव टोलनाका येथे होता.
राज्यभर आंदोलन : मुंबई-अहमदाबाद हायवेवर बच्चू कडू यांच्या समर्थकांनी चक्काजाम केला. नाशिक येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात नेर येथे आंदोलकांनी रस्ता अडवला. तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गोंदिया जिल्ह्यात तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्गावर विरसी येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. याशिवाय, राज्यात एकूण तीनशे ठिकाणी चक्काजाम आंदोलन शेतकरी करत आहेत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

