ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

तीन डोळे असणाऱ्या मधमाश्यांचं अनोखं विश्व; राणी मधमाशी दररोज घालते 800 ते 1500 अंडी!

प्रा. विद्यानंद अहिरे हे चिखलदरा येथे आदिवासी बांधवांना मधमाशी पालन आणि मध संकलन प्रशिक्षण देण्यासाठी आले असता त्यांनी मधमाशांच्या उलगडलेल्या अनोख्या विश्वाबाबत माहिती दिलीय.

अमरावती : गोड, चवदार मध हा प्रत्येकालाच आवडतो. मात्र मधमाशी म्हटली की, अंगावर काटाच येतो. मधमाशांच्या पोळ्यावर घोंगावणाऱ्या मधमाशा जंगलात अनेक मोठ्या झाडांवर दिसतात. तशा शहरात अनेक इमारतींच्या छताच्या आडोशालाही मधमाशांचं पोळं दिसतं. विशेष म्हणजे या पोळ्यात मधमाशांचं एक अनोखं विश्व दडलंय. मधमाशीला तीन डोळे असतात. मधमाशांच्या साम्राज्यात राणी ही प्रमुख असते. राणीच्या आदेशाशिवाय कोणी काहीही करू शकत नाही, हा पक्का नियम. या राणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती एकदाच नरासोबत मिलन करते आणि त्यानंतर आयुष्यभर आठशे ते पंधराशे अंडी दररोज देत राहते. मधमाशांचे अभ्यासक असणारे जळगाव जिल्ह्यातील ढालसिंगी येथील रहिवासी आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागात मधमाशी पालन प्रशिक्षक म्हणून देशभर काम करणारे प्रा. विद्यानंद अहिरे हे चिखलदरा येथे आदिवासी बांधवांना मधमाशी पालन आणि मध संकलन प्रशिक्षण देण्यासाठी आले असता त्यांनी मधमाशांच्या उलगडलेल्या अनोख्या विश्वाबाबत माहिती दिलीय. त्याबाबतचा “खरा संवाद”चा हा स्पेशल रिपोर्ट.

 

मधमाशांचे तीन प्रमुख प्रकार : “निसर्गातल्या अद्वितीय चमत्कारांपैकी मधमाशांचं आयुष्य एक आहे. त्यांच्या छोट्याशा शरीरात अतुलनीय शिस्त, मेहनत, विज्ञान आणि समाजजीवन दडलंय. मधमाशांचे तीन प्रमुख प्रकार आहेत. यामध्ये अंडी घालणारी एकमेव मधमाशी म्हणजे राणी मधमाशी. तिच्या उपस्थितीवरच संपूर्ण पोळ्याचं अर्थात त्यांच्या संपूर्ण वसाहतीचं अस्तित्व अवलंबून असतं. त्यानंतर कामकरी मधमाशा हा दुसरा प्रकार आहे. या सर्व स्त्री मधमाशा असून त्या अंडी घालू शकत नाहीत. अन्न आणणं, पोळं तयार करणं, पोळ्याचं तापमान नियंत्रित ठेवणं, राणीची सेवा अशी अनेक कामं कामकरी मधमाशा करतात. तसंच तिसरा प्रकार हा नर मधमाशांचा असून ते राणी सोबत संभोगासाठी असतात. मधमाशांच्या या विश्वात एक राणी, 98 टक्के कामकरी मधमाशा आणि 2 टक्के नर असतात, ” असं प्रा. विद्यानंद अहिरे यांनी स्पष्ट केलं.

नर हा ऐतखाऊ असतो : “राणी मधमाशी ही स्वच्छ सूर्यप्रकाशात तिच्या वसाहतीमधल्या किंवा इतर वसाहतीमध्ये राहणाऱ्या तीक्ष्ण नजर आणि मजबूत पंखांचा बांधा असणाऱ्या सात ते आठ नरांसोबतच संभोग करते. हे नर थोडे काळसर आणि जाड असतात. या मिलनानंतर नर खाली जमिनीवर कोसळतो आणि मरतो. यानंतर राणी मधमाशी कधीही आयुष्यात दुसऱ्या नरासोबत मिलन करत नाही आणि पुढं तिच्या चार ते पाच वर्षांच्या आयुष्यात दररोज आठशे ते पंधराशे अंडी घालत राहते. तर नर हा ऐतखाऊ असतो, तो कुठलाही काम करत नाही,” असं प्रा. विद्यानंद अहिरे यांनी सांगितलं.

मधमाशांचा असा होतो जन्म : “राणी मधमाशी एकूण दोन प्रकाराची अंडी घालते. यामध्ये फलित आणि अफलित असे दोन प्रकार आहेत. फलित अंड्यातून कामकरी आणि राणी मधमाशी जन्माला येते. अफलित अंड्यातून नर जन्म घेतो. राणी मधमाशी शिवाय इतर मधमाशा अंडी देत नाहीत. त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या गर्भाशयच नसतो. आपलं पोळं बांधणं, त्याची स्वच्छता ठेवणं, पिलांना खाऊ घालणं ही जबाबदारी कामकरी मधमाशा पूर्ण करतात,” असं प्रा. विद्यानंद अहिरे म्हणाले.

अशी ठरते नवी राणी : “राणीचा मृत्यू झाला तर 24 तासात राणीगंध कमी होतो. यानंतर राणीचा मृत्यू झाल्याचं वसाहतीमधल्या कामकरी व नर मधमाशांना कळतं. मग ते पुढील पिढीसाठी आपल्या पोळ्यात काही कामकरी मधमाशांना राणी मधमाशीनं घातलेल्या फलीत अळी अवस्थेतील काही मोजके तीन ते आठ जणांची निवड करतात. त्या अळीच्या घरात शाही भोजन सलग सात दिवस भरवितात. ही एक प्रकारे कामाची जबाबदारी असते. मग अशा घरातून लांब करंगळी सारख्या आकारातील घरातून 16 व्या दिवशी राणी जन्म घेते. जर अशावेळी दोन किंवा चार राणी जन्माला आल्या तर त्यांच्यात युद्ध होतं‌. एकमेकींना आपल्या डंखाद्वारे त्या मारुन टाकतात. जी शक्तिशाली असेल, ती जगते. तीच मालक बनते. एकच राणी आपल्या पोळ्यात म्हणजे वसाहतीत असते. तसंच मधमाशांमध्ये मातृसत्ताक पद्धत आहे. राणी अधिराज्य गाजवते, ” असं देखील प्रा. विद्यानंद अहिरे यांनी सांगितलं.

मध तयार करण्याची प्रक्रिया : “मधमाशी आपल्या पोळ्यापासून 20 ते 25 मिनिटांत तीन किलोमीटर प्रवास करते. यावेळी ती चारशे ते पाचशे फुलांमधून मकरंद घेते. मधमाशीच्या पोटात दोन कप्पे आहेत. एका कप्प्यात ती भूक क्षमविण्यासाठी मकरंद टाकते. दुसऱ्या कप्प्यात टाकलेलं मकरंद पोळ्यात आणून उलटी करून ठेवते. या मकरंदात 90 टक्के पाणी आणि 20 टक्के गोडवा असतो. कधीही न झोपणारी मधमाशी पोळ्यातील मकरंद पुन्हा आपल्या पोटात टाकते. सर्वच मधमाशा ही क्रिया सोबत करतात. आता पोटात टाकलेलं मकरंद पुन्हा त्या बाहेर काढतात. त्यामुळं आता मधमाशांच्या पोटातून बाहेर येतं. ते मकरंद नाही तर मध असतं. यामध्ये पाण्याचा प्रमाण 20 टक्के आणि साखरेचं प्रमाण हे 80 टक्के होतं. आपल्या पोळ्यात वरच्या बाजूला हे मध या मधमाशा साठवून ठेवतात. आपल्या पंखांनी अतिशय वेगात या मधावर फडफड करून त्यात असणारं पाणी झिरपवतात. भविष्यात दुष्काळ पडल्यावर हे मध खाल्ल जातं. बाहेर चक्क ऊन असेपर्यंत मधमाशा फुलांतील मकरंद खातात आणि मध तयार करण्यासाठी मकरंद घेऊन येतात, ” असं प्रा. विद्यानंद अहिरे म्हणाले.

मेणापासून बनतं पोळं : दरम्यान, मधमाशांचं पोळं हे देखील एक अनोखं वैशिष्ट्यच. कामकरी मधमाशांनी 10 किलो मध खाल्ल्यावर एक किलो मेण तयार होतं. मधमाशीच्या खालचा भागात असणाऱ्या चार ग्रंथीच्या आठ कप्प्यातून मेण शरीराबाहेर टाकलं जातं. या मेणापासूनच त्यांना राहण्यासाठी त्या पोळं तयार करतात.

प्रा. विद्यानंद अहिरे यांचा मधमाशांवर गाडा अभ्यास : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे काहीकाळ प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर गेल्या 14 वर्षांपासून प्रा. विद्यानंद अहिरे हे संपूर्ण देशभर मधमाशी संगोपन, मधमाशी व्यवसायाबाबत राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांतर्गत वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देतात. तसंच खादी व ग्रामोद्योग आयोग, ग्राम विकास मंत्रालय, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठं याठिकाणी ते काम करतात. याशिवाय, प्रा. विद्यानंद अहिरे हे दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात. आज भारतात 30 प्रकारचे मध गोळा केल्या जातं तर जगभरात मधाचे 300 प्रकार आहेत. मधमाशी वाचवा आणि शेती फुलवा, असा संदेश प्रा. विद्यानंद अहिरे देतात.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.