कुख्यात गुंड डब्लू यादवचा एन्काऊंटर; ‘इतक्या’ राज्यातील पोलिसांनी फत्ते केली मोहीम
कुख्यात गुंड डब्लू यादव याचा एन्काऊंटर करण्यात पोलीस दलाच्या जवानांना यश आलं. डब्लू यादव याच्यावर 50 हजार रुपयाचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं.

लखनऊ : बेगुसरायचा कुख्यात गुंड डब्लू यादव याचा एन्काऊंटर करण्यात पोलिसांना यश आलं आहे. डब्लू यादव या कुख्यात गुंडाचा एन्काऊंटर करण्यासाठी तब्बल चार राज्यातील पोलिसांनी मोहीम राबवली. अखेर पोलीस दलातील जवानांना डब्लू यादव याचा एन्काऊंटर करण्यात यश आलं. डब्लू यादव याच्यावर 50 हजार रुपयाचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं. ही कारवाई बिहार, नोएडा एसटीएफ आणि हापूर पोलिसांनी केली, अशी पोलीस अधीक्षक ज्ञानंजय सिंह यांनी दिली.
चकमकीत कुख्यात गुंड डब्ल्यू यादवला गोळी लागली. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्यावर 50 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.” – ज्ञानंजय सिंह, एसपी, हापूर
बेगुसरायचा कुख्यात गुंड होता डब्ल्यू यादव : डब्लू यादव हा सूर्य नारायण यादव याचा मुलगा होता. तो ग्यांडोल पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या साहेबपूर कमल इथला राहणारा होता. याबाबत पोलीस अधीक्षक ज्ञानंजय सिंह यांनी सविस्तर माहिती दिली. डब्ल्यू यादव या कुख्यात गुंडाविरोधात बिहारमध्ये तब्बल 24 गुन्हे दाखल आहेत. हापूरचे अनेक मोठे व्यापारी त्याच्या निशाण्यावर होते. बिहार एसटीएफ, नोएडा एसटीएफ आणि सिम्भाओली पोलिसांनी संयुक्तपणे डब्लू यादव एन्काऊंटर कारवाई पार पाडली.
दीड दशकापासून पसरवत होता दहशत : कुख्यात गुंड डब्लू यादव याच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. डब्ल्यू यादव गेल्या दीड दशकापासून गुन्हेगारी करत होता. त्याचं नाव बेगुसराय पोलिसांच्या टॉप लिस्टमध्ये होतं. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, बेकायदेशीर शस्त्रं बाळगणं, साक्षीदारांवर हल्ला करणं, अपहरण असे आरोप होते. बेगुसरायमध्ये गुंड डब्लू यादव याच्यावर एकूण 22 गुन्हे दाखल होते. बलियामध्ये एक आणि मुंगेरमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. डब्ल्यू यादव टोळी चालवत होता, दहशत टिकवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करत होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
राजकीय पक्षाच्या नेत्याची हत्या : 24 मे 2025 रोजी एचएएम पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष विकास कुमार यादव उर्फ राकेश कदम यांची डायरा परिसरात नेऊन हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह वाळूत पुरण्यात आला. एका खटल्यातील साक्षीदार महेंद्र यादव यांची गोळ्या घालून 2017 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बेगुसरायच्या साहेबपूर कमल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डब्ल्यू यादववर बेकायदेशीर शस्त्रं बाळगल्याचाही आरोप आहे. त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

