मंगेश काळोखे हत्या प्रकरण: २० लाखांची सुपारी आणि पुणे कनेक्शन; पोलिसांनी केला ‘शार्प शूटर’ला अटक

खोपोली: रायगड जिल्ह्यातील खोपोलीला हादरवून सोडणाऱ्या माजी नगरसेवक मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हत्येचा कट उलगडताना धक्कादायक माहिती समोर आली असून, ही हत्या राजकीय वैमनस्यातून आणि २० लाख रुपयांची सुपारी देऊन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून एका सराईत गुन्हेगाराला (शार्प शूटर) अटक केली आहे.
पुण्यातून ‘शार्प शूटर’ गजाआड रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडातील मुख्य हल्लेखोरांपैकी एक असलेल्या खालिद खलील कुरेशी (वय २३) याला पुण्याच्या वानवडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी खालिद हा मूळचा पुण्याच्या हडपसर भागातील सय्यदनगर येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या तपासात त्याने कबुली दिली की, मंगेश काळोखे यांची हत्या करण्यासाठी २० लाख रुपयांची सुपारी घेण्यात आली होती. या कामासाठी त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा कट अमलात आणला.
राजकीय वैर आणि हत्येचा कट पोलिस तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, हे हत्याकांड पूर्णपणे पूर्वनियोजित होते. नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे (शिवसेना शिंदे गट) यांनी आरोपी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि जुन्या राजकीय वैमनस्यातून रवींद्र देवकर याने हत्येचा कट रचला. यासाठी त्याने मध्यस्थ इशा पापा शेख हिच्या मार्फत पुण्यातील गुन्हेगारांना संपर्क साधून २० लाखांची सुपारी दिली.
नेमकं काय घडलं होतं? २६ डिसेंबर रोजी सकाळी मंगेश काळोखे आपल्या मुलीला शाळेत सोडून परतत असताना, खोपोलीतील जया बार जवळ हल्लेखोरांनी त्यांना गाठले. तोंडाला रुमाल बांधलेल्या ५ ते ६ हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता.
तपासाची सद्यस्थिती या प्रकरणात आतापर्यंत मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर, त्याची पत्नी उर्मिला देवकर, मुलगा धनेश देवकर यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेला खालिद कुरेशी हा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्येही सराईत असल्याचे समोर आले आहे. पोलिस आता या प्रकरणातील फरार असलेल्या आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे काळोखे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मंगेश काळोखे यांच्या मुलींनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

