ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गणेशोत्सवात पुणे मेट्रो रात्री 2 पर्यंत धावणार; नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले… – AJIT PAWAR

सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं अधिक उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्री पदाबाबत महायुती सरकारमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अजूनही दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपद जाहीर झालं नाही. दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव पुढं येत असताना त्यांना विरोध होताना दिसून येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी सांगितलं, “ज्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की, आपण नाशिक आणि रायगडच पालकमंत्री पद जाहीर करावं. तेव्हा ते करतील. हा त्यांचा अधिकार आहे. तुमचा, माझा कोणाचाही अधिकार नाही. आजपर्यंत या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही अडचण आम्ही येऊ दिली नाही. याबाबतचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असून याबाबत कोणालाही विचारायचं कारण नाही, ” असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीनं आयोजित ग्रामीण भागातील मुलींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सायकल बँक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचं आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय इथं आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “आज सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं अधिक उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यासाठी राज्यातील सगळी यंत्रणा झोकून काम करणार आहे. सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील आणि शेवटच्या दिवशी देखील मेट्रो चालू राहील,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

विमानतळाला काही लोकांचा विरोध : “पुणे ग्रँड चॅलेंज टूरमध्ये दोन्ही पालिका, जिल्हा परिषद अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं काम होणार आहे. तसंच आज लोगो तयार केला आहे. दुसरी बाब म्हणजे पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. काही गावांमध्ये 1285 एकर जमीन भूसंपादन सहमती पत्र सादर करण्याकरिता सूचना देऊन अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. पुरंदर विमानतळाला काही लोकांचा विरोध आहे. मात्र चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून त्यांची बाजू समजून घेऊ. जिथं भूसंपादन होणार आहे. तिथं कुठलंही गाव जात नाही. पण काही घरं जात आहे, त्यांना योग्य मोबदला देण्यात येणार आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं देखील बारकाईनं लक्ष : राज्यात मागील काही दिवसांपासून विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता, त्यांना सांगितलं की, “पश्चिम महाराष्ट्रामध्ये माणिकडोहमध्ये पाणी कमी आहे. बाकी धरणं भरलेली आहेत. अत्यंत बारकाईनं लक्ष ठेऊन आम्ही आहोत. काही ठिकाणी जो रेड अलर्ट देण्यात आला होता. त्याचा धोका टळला आहे. राज्यातील काही ठिकाणी पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आहे. जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तिथं पंचनामा करायला सांगितलं आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचं देखील बारकाईनं लक्ष आहे. भीतीचं कारण राहिलेलं नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेतलीय : दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीबाबत गणेश मंडळांचा वाद सुरू आहे. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. यावेळी, “मला गणेश मंडळांचे कार्यकर्ते भेटले. त्यांनी आम्हाला सकाळी 7 वाजता निघू द्या, असं सांगितलं आहे. गणेशोत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त सहभागी होतात. राज्यानं सुद्धा आता राज्य महोत्सव दर्जा दिला आहे. यामुळं त्या सगळ्या मंडळाशी बोलून मतभेद राहणार नाहीत. मानाचे गणपती यांचा मान ठेऊन विसर्जन मिरवणूक जेवढं सकाळी काढता येईल, तेवढा करू. तसंच विसर्जन मिरवणुकीत किती ढोल ताशा पथक संख्या हवी याबाबत देखील मानाचे गणपती यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होत आहे. काल सुद्धा मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेतलीय, ” असं अजित पवार यांनी सांगितलं.

कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये : याचबरोबर, नेवासा इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, “आम्ही सातत्यानं सांगत आहे की, शून्य टक्क्यानं पीक कर्ज देत आहे. वर्षाला 12 हजार अनुदान देण्यात येत आहे. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविले जात आहे. तसंच आज बैलपोळा असून बैलपोळाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. याबाबत काय झालं आहे, मी माहिती घेतो कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, ” असं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.