मिथुन चक्रवर्ती – ‘कलाकार म्हणून जेव्हा एखादे पात्र मला उत्साही आणि जिवंत वाटते, तेव्हाच मी त्याला अंगीकारतो’
मिथुन चक्रवर्तीचा आगामी चित्रपट ‘द बंगाल फाईल्स’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता त्यांनी या चित्रपटाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.

मुंबई – मिथुन चक्रवर्ती हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी १९७६ साली मृणाल सेन दिग्दर्शित ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्यानंतर त्यांनी अॅक्शन, रोमांन्स, ड्रामा आणि कॉमेडी अशा विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. ८०च्या दशकात ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळं ते संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झाले. त्यांच्या नृत्यशैलीनं आणि व्यक्तिमत्त्वानं त्या काळातील तरुणाईला भुरळ घातली आणि त्यांना सुपरस्टारचा दर्जा मिळाला.
मिथुन यांनी बंगाली चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांनी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत, जे त्यांच्या अभिनय कौशल्याचे प्रतीक आहे. चित्रपटांसोबतच त्यांनी टीव्हीवरही आपली छाप सोडली आणि ‘डान्स इंडिया डान्स’ या रियालिटी शोमध्ये त्यांचा “ग्रँड मास्टर” अवतार प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आजही ते विविध भूमिकांमध्ये सक्रिय असून, प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. साधेपणा, मेहनत आणि आपुलकी या गुणांमुळं मिथुन चक्रवर्ती हे चाहत्यांच्या हृदयात सदैव विशेष स्थान राखून आहेत. आता त्यांची महत्वपूर्ण भूमिका असलेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट येऊ घातलाय. त्यानिमित्तानं मिथुनदा यांनी ‘झूम’वरून पत्रकारांशी संवाद साधला आणि आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी त्यावर सादर केलेला हा मुलाखतवजा वृत्तांत.
खरा संवाद : लवकरच तुमचा ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. आपल्या कलात्मक प्रवासात तुम्ही विनोदी, थ्रिलर आणि अॅक्शन अशा विविध जॉनरमधून बहुरंगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मात्र अलीकडे तुम्ही विशेषत: भारताच्या इतिहासावर आधारित चित्रपटांमध्येच दिसत आहात. यावर तुमचं म्हणणं काय आहे?
मिथुन चक्रवर्ती : मी आता केवळ भारताच्या इतिहासावर आधारितच चित्रपट करतोय, असे मुळीच नाही. सध्या मी प्रभाससोबत ‘फौजी’ हा देशभक्तिपर चित्रपट करीत आहे, ज्याचा सांस्कृतिक आविष्कार पूर्णपणे वेगळा आहे. त्यानंतर माझा रजनीकांतसोबतचा ‘जेलर’ हा आणखी एक भिन्न शैलीतील चित्रपट येत आहे. याशिवाय ‘प्रोजापोती २’ देखील प्रेक्षकांसमोर येणार असून त्याची कथा विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच मी फक्त ऐतिहासिक विषयांवरच लक्ष केंद्रित करतो, असा कुठलाही नियम माझ्याकडे नाही. माझी निवड नेहमीच विविधतेकडे झुकणारी असते. एखादे पात्र जर मला मनापासून भावले, तर ते साकारण्याकडेच माझा कल असतो.
खरा संवाद : ‘द बंगाल फाइल्स’ची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. ट्रेलर लॉन्चच्या वेळी या चित्रपटाला पुढील आर-रेटेड (R-Rated) कलाकृती म्हटले गेले होते. मात्र, प्रत्यक्ष ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा काही ठिकाणी त्याविषयी आक्षेप नोंदवले गेले. नियोजित स्थळी ट्रेलर दाखवला गेला नाही, शिवाय ख्यातनाम अभिनेते शास्वत चॅटर्जी यांनीसुद्धा या चित्रपटापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींविषयी तुमचे मत काय आहे?
मिथुन चक्रवर्ती : हा चित्रपट नक्कीच अंतःकरणाला स्पर्श करणारा आहे. खरं तर प्रत्येक ‘खरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतोच. दुसरी गोष्ट म्हणजे, या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्धरीत्या पार पाडली गेली. तरीही ट्रेलर दाखवण्यात का अडथळा आला? मला स्वतःला चित्रपटात दर्शविलेले इतिहासातील हे सर्व तपशील माहीत नव्हते, कारण हे प्रसंग माझ्या जन्माआधीचे आहेत. परंतु इतिहास काय सांगतो? केवळ एकच ओळ, “नोआखलीत हत्याकांड झाले.” पण का झाले, कुठे घडले, काय नेमके घडले, याबाबत काहीही सांगितले गेले नाही. कलकत्त्याच्या हत्याकांडालाही केवळ एका ओळीत सामावून टाकण्यात आले आहे. सहा पिढ्या उलटून गेल्या, तरी कुणालाही संपूर्ण सत्य समजू शकलेले नाही. मग मला सांगा, देशाच्या इतिहासात नेमके काय घडले, हे प्रत्येकाला माहीत होणे आवश्यक नाही काय? चाळीस हजार हिंदूंचा निर्दय संहार झाला. नोआखलीत अक्षरशः ‘जेनोसाइड’ घडला. या भीषण नरसंहाराची व्याप्ती सर्वांना ज्ञात झाली पाहिजे, नाही का? मग इथे आक्षेप नेमका कोणता? केवळ सत्य उघड केले जात आहे, हाच एकमेव आक्षेप असल्याचे दिसते, आणि तोच खरा आक्षेप असावा.
खरा संवाद : जेव्हा आपण ऐतिहासिक किंवा राजकीय घडामोडी पडद्यावर साकारता, तेव्हा एक कलाकार म्हणून तुम्हाला असं वाटतं का की, वस्तुनिष्ठ राहणं सहज शक्य असतं? आजकाल प्रेक्षकांमध्ये ‘प्रोपोगंडा’ अथवा प्रचारकी चित्रपटांबद्दल चर्चा रंगताना दिसते. या संदर्भात तुमचं मत काय आहे?
मिथुन चक्रवर्ती : प्रचारकी चित्रपट म्हणतात ते का? कारण जेव्हा आपण सत्य बोलायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यालाच अचानक ‘प्रोपोगंडा’ अथवा ‘प्रचार’ असं नाव दिलं जातं. खरी समस्या तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांमध्ये आहे, त्यांच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेत आणि दिखाऊ बुद्धिवादात आहे. याच लोकांमुळं असे वाद निर्माण होतात. आता हे धर्मनिरपेक्ष कोण? एखादा गोमांस खातो, तर दुसरा डुकराचे मांस खातो. ज्याला एकाचा स्पर्शही नकोसा वाटतो, तो धर्मनिरपेक्ष म्हणवायचा? खरी धर्मनिरपेक्षता म्हणजे दोन्ही स्वीकारण्याची क्षमता, दोन्ही गोष्टींकडे समान दृष्टीनं पाहण्याची ताकद. पण या ढोंगी वृत्तीमुळेच अनावश्यक विवादांना तोंड फुटतं आणि समाजात कलह वाढतो.
खरा संवाद : असं का वाटतं की, लोक सत्य बाहेर यायला देत नाहीत? जसं तुम्ही म्हणालात, प्रत्येक पिढीला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. मग राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी मंडळी हेच सत्य दडपून ठेवण्याचा प्रयत्न का करतात?
मिथुन चक्रवर्ती : फाळणीच्या काळातील हा प्रसंग पूर्णपणे वेगळा होता. त्याचे सूक्ष्म तपशील फक्त चित्रपट पाहिल्यावरच समजतील. पण खरे सत्य लोक सांगायलाच इच्छित नाहीत, कारण ते उघड झाले की असंख्य प्रश्न निर्माण होतात. मीसुद्धा केवळ एकच ओळ वाचली होती, “नोआखलीत हत्याकांड झाले”, एवढंच. मग खरं कोण लपवतंय? आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या दुःखाबद्दल, आपल्याला स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळाले याबद्दल प्रत्येक भारतीयाला माहिती असायलाच हवी. कारण हा केवळ एक दंगलीचा प्रसंग नव्हता, तर भीषण जेनोसाइड होता—चाळीस हजार हिंदूंचा निर्दयतेने बळी घेतला गेला. हे आपण जाणून घ्यायला नको का? आपला इतिहास जाणून घेणे म्हणजे आपल्या अस्तित्वाला खरी दिशा देणे होय.
खरा संवाद : चित्रपटाचं मूळ नाव ‘द दिल्ली फाइल्स’ होतं. मग नंतर ‘द बंगाल फाइल्स’ करण्यात आलं. हे बदलण्यामागे काही कारण होतं का?
मिथुन चक्रवर्ती: प्रारंभी या चित्रपटाची कथा दिल्लीभोवती गुंफलेली असल्याने त्याला ‘द दिल्ली फाइल्स’ असे नाव देण्यात आले होते. मात्र पुढे कथानकाचा केंद्रबिंदू नोआखली आणि कलकत्त्यातील भीषण हत्याकांडांकडे सरकल्यामुळे, या चित्रपटाचे शीर्षक बदलून अधिक समर्पक असे ‘द बंगाल फाइल्स’ ठेवण्यात आले.
खरा संवाद: ‘द बंगाल फाइल्स’ ही बंगालमधील अंधाऱ्या आणि कठीण वास्तवावर आधारलेली कथा आहे. तर हे पात्र स्वीकारण्यामागे एखादे विशेष कारण होते का? की फक्त तुम्ही बंगाली आहात म्हणूनच ही भूमिका निवडली?
मिथुन चक्रवर्ती : नाही, मी फक्त बंगाली आहे म्हणून हे पात्र स्वीकारले, असे अजिबात नाही. त्यामागे एकच कारण होते, ते म्हणजे भूमिकेचे वैशिष्ट्य. विवेक अग्निहोत्रींनी ही भूमिका मला दिल्यानंतर मी पहिल्यांदा स्पष्ट सांगितले होते की, “हे पात्र माझ्याकडून होणे शक्य नाही.” कारण हे अत्यंत वेदनादायी आणि आव्हानात्मक पात्र होते. माझ्या व्यक्तिरेखेची जीभ जळालेली, लोक त्याला वेडा समजतात, तो कचऱ्यातून अन्न शोधतो, रस्त्यावरच झोपतो. अशा परिस्थितीत इतका त्रास सहन केलेला मनुष्य संवाद कसा साधेल, बोलण्यातून आपले अस्तित्व कसे मांडेल—हा प्रश्न मला सतत पडत होता. यासाठी मी प्रचंड परिश्रम घेतले, अभ्यास केला आणि मग या व्यक्तिरेखेला साकारण्याची योग्य पद्धत ठरवली. शेवटी केवळ त्या पात्रानं मला मनापासून आकर्षित केले म्हणूनच मी ते स्वीकारले. कलाकार म्हणून जेव्हा एखादे पात्र मला उत्साही आणि जिवंत वाटते, तेव्हाच मी त्याला अंगीकारतो.
खरा संवाद : चित्रपटाचं नाव ‘द बंगाल फाइल्स’ आहे. यामध्ये बंगालमधील अनेक घटना प्रतिबिंबित होताना दिसतात. प्रेक्षकांसाठी तुम्ही कोणता संदेश द्यायचा प्रयत्न करत आहात?
मिथुन चक्रवर्ती : संदेश अत्यंत सरळ आहे. या साऱ्या घटना माझ्या जन्मापूर्वी घडल्या. मला त्याची काहीच माहिती नव्हती. फक्त एक-दोन ओळी वाचल्या होत्या, नोआखलीतील हत्याकांड आणि कलकत्त्यातील दंगल. पण त्या का घडल्या? हे कुणालाच ठाऊक नव्हतं. साहित्यामध्येही याचा ठसा दिसत नाही. मग पिढ्यान्पिढ्या हे सत्य का दडपलं गेलं? आता मात्र ते सर्वांसमोर येत आहे. खरं काय घडलं हे जनतेला कळलं, तर त्यात चुकीचं काय आहे?
खरा संवाद: तुमच्या कारकिर्दीत तुम्ही विविध भूमिका साकारल्या आहेत. अजून एखादी भूमिका किंवा शैली आहे का, जी तुम्हाला अनुभवायची आहे?
मिथुन चक्रवर्ती: लोक मला वारंवार (Osho) ‘ओशो’ची भूमिका मी साकारावी, अशी विनंती करतात, आणि आम्ही त्यावर प्रत्यक्षात कामही सुरू केले आहे. तसेच माझ्याही मनात एक स्वप्न आहे, (Che Guevara) ‘चे गुएवारा’ची भूमिका साकारण्याचं.
खरा संवाद: गोपाल चंद्र मुखर्जी यांच्या नातवाने एफआयआर दाखल केला आहे की त्यांच्या आजोबांची प्रतिमा चित्रपटात विकृत केली गेली आहे. त्यावर शास्वत मुखर्जी यांनी मात्र सांगितले की, कलाकार म्हणून ते या वादापासून दूर आहेत. याबाबत तुमचं मत काय?
मिथुन चक्रवर्ती: माझ्या मते ‘गोपाल पाथा’ या पात्राचं विकृतीकरण चित्रपटात अजिबातच झालेलं नाही. परंतु त्यांचा नातू प्रश्न उपस्थित करू शकतो, हा त्याचा अधिकार आहे. साधारणतः काही वेळा सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात येते, हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र त्यांचा नेमका काय आक्षेप आहे, हे फक्त तेच स्पष्ट करू शकतात.
खरा संवाद: विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटांबद्दल कायम वादविवाद सुरू असतात. त्यांच्यावर प्रोपोगंडा फिल्म्स बनवल्याचे आरोपही होतात. तुम्हाला त्यांच्यासोबतचा अनुभव कसा वाटला?
मिथुन चक्रवर्ती: मी याआधीही त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि आमचं उत्तम ट्युनिंग जुळतं. कलाकार म्हणून ते मला व्यवस्थित ओळखतात. जेव्हा ते लेखन करतात, तेव्हा एखादं पात्र माझ्या व्यक्तिमत्त्वाशी जवळीक साधेल असं रचतात. मात्र, त्यांनी मला ही भूमिका दिली तेव्हा मी खूप धास्तावलो होतो, कारण त्या पात्रानं प्रचंड हालअपेष्टा सोसलेल्या होत्या, त्याची जीभ जळालेली होती. मी कित्येकदा प्रयत्न करून पाहिला, योग्य पद्धत ठरवली, आणि अखेर विवेकला ते सादरीकरण आवडलं. ही माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण भूमिका ठरली, आणि मी ती पार पाडली. आता ती प्रेक्षकांच्या कसोटीवर आहे, आता त्यांनीच ठरवावं, कशी वठवली गेलीय ते.

