मेळघाटात ‘डोलार उत्सव’ उत्साहात साजरा; लाकडाच्या झोक्यावर महिलांची गाणी
मेळघाटची आदिवासी संस्कृती खूप समृद्ध आहे. आदिवासी परंपरेत पारंपरिक नृत्याला खूप महत्त्व आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधवांनी तीच परंपरा जोपासलीय.
अमरावती : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात आदिवासी बांधव पोळ्याच्या करीला डोलार हा पारंपरिक उत्सव साजरा करतात. पूर्णतः लाकडांनी तयार केलेल्या झोक्यावर एकाचवेळी अनेक महिला झोका घेत गीत गाऊन हा उत्सव साजरा करतात. रविवारी आणि सोमवारी मेळघाटात अनेक गावात हा ‘डोलार उत्सव’ आनंदात साजरा करण्यात आला.
‘अशी’ आहे परंपरा : श्रावण महिन्यात संपूर्ण जंगल हिरव्यागार वनस्पतींनी बहरतं. आषाढ अमावास्येपासून आदिवासी बांधव ‘जिरोती उत्सव’ साजरा करतात. जिरोतिच्या पहिल्याच दिवशी गावात लाकडाचा डोलार अर्थात झोका तयार करतात. गावात नाच गाणं होतं. यानंतर संपूर्ण श्रावण महिन्यात महिला रोज सायंकाळी या डोलारवर बसून झोका घेतात.
‘असा’ असतो डोलार उत्सव : जिरोती उत्सवाची सांगता म्हणजे ‘डोलार उत्सव’ असतो. यादिवशी जंगलात बहरलेल्या विविध वनस्पतींची पानं, फुलं पुरुष मंडळी सकाळी तोडून आणतात. यानंतर या पानफुलांची गावात मिरवणूक निघते. या पानाफुलांनी संपूर्ण डोलार सजवला जातो. सायंकाळी गावातील महिला छान नटून, थाटून या डोलारवर बसतात आणि एकचवेळी अनेक महिला झोका घेत पारंपरिक गाणी गातात.
मिरवणुकीनं डोलार विसर्जन : दिवसभर डोलार उत्सव साजरा झाल्यावर सायंकाळी अंधार पडताच पानांफुलानी सजवलेल्या डोलारची गावालगत वाहणाऱ्या नदीच्या दिशेनं वाजत गाजत मिरवणूक निघते. यावेळी पुरुष आणि महिला गदली सुसून हे पारंपरिक नृत्य करतात. यानंतर हा संपूर्ण डोलारचं नदीत विसर्जन केलं जातं.
‘या’ गावात डोलार उत्सव : मुख्यतः चिखलदरा तालुक्यातील खडीमल, पायविहिर, चूर्णी, खडीमल, कुही, बिबा, चुनखडी यांसह मध्यप्रदेशात अनेक आदिवासी गावात ‘डोलार उत्सव’ पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. याबाबतची सविस्तर माहिती आदिवासी लोककलेचे अभ्यासक, प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांनी खरा संवादशी बोलताना दिली.

