सारडा महाविद्यालयातील अंतर्गत संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत; प्राचार्यांविरोधात प्राध्यापकांची तक्रार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात गेल्या काही काळापासून सुरू असलेला प्राचार्य आणि प्राध्यापकांमधील अंतर्गत वाद अखेर उघडपणे समोर आला असून, या प्रकरणाने थेट पोलीस ठाण्याची पायरी चढवल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे यांच्याविरोधात शिवीगाळ, धमकावणे आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत प्राध्यापकांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात तक्रारदार म्हणून प्राध्यापक सत्तेंद्र बरतीराम गडपायले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास काही प्राध्यापक उशिरा महाविद्यालयात पोहोचल्याच्या कारणावरून प्राचार्य डॉ. चौबे यांनी त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावले. संबंधित प्राध्यापकांनी वाहन पंचर झाल्यामुळे काही मिनिटांचा विलंब झाल्याचे सांगून कारण स्पष्ट केले असतानाही, त्यांना प्रथम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर थांबवण्यात आले. त्यानंतर केबिनमध्ये बोलावून कथितरित्या अपमानास्पद, अवमानकारक आणि दबाव टाकणाऱ्या भाषेत बोलण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, केवळ ही एकच घटना नसून गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून प्राचार्यांकडून प्राध्यापकांना सातत्याने मानसिक व आर्थिक स्वरूपाचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार निलंबनाची धमकी देणे, पगार कपात करण्याची भीती दाखवणे, तसेच कामाच्या ठिकाणी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. काही महिला प्राध्यापकांशीही कथितरित्या अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
याशिवाय, सुट्टीच्या दिवशीही महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब कामगार कायदे तसेच शैक्षणिक नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा प्राध्यापकांनी केला आहे. तसेच, प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे यांचा नियमानुसार कार्यकाळ संपल्यानंतरही ते पदावर कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, त्यांच्या मुदतवाढीबाबत कोणतेही लेखी किंवा अधिकृत आदेश अद्याप सादर करण्यात आले नसल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणानंतर संतप्त प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. जोपर्यंत संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने प्राप्त तक्रारीची दखल घेत प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती नेमकी कोणती भूमिका घेते, तसेच पोलीस तपासातून सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासह अंजनगाव सुर्जीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

