कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, आरोग्य यंत्रणा विस्कळीत
सहाव्या दिवशी मोर्चा काढत सीईओ, कलेक्टर, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सहा दिवसांनंतरही सुरूच आहे. या संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. सोमवारी संपाच्या सहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सीईओ, डीएचओ, कलेक्टर ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत समायोजनाच्या मागणीचे निवेदन दिले.
आरोग्यसेवेत मोठ्या प्रमाणावर एनएचएमअंतर्गत कंत्राटी डॉक्टर, तसेच कर्मचारी कार्यरत आहेत. वर्ष २००५ पासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात १४ मार्च २०२४ रोजी शासनाने दहा वर्षापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवेत नियमित करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला; परंतु त्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तसेच वार्षिक वेतनवाढ, विमासुरक्षा, एचआर पॉलिसी अशा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन केले होते; परंतु तरीही मागण्या मान्य न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने १९ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरूच आहे. या आंदोलनामध्ये अशोक कोठारी, अंकुश मानकर, मनीष पिजरकर, महेंद्र अंबुलकर, रवी चंद्रे, राहुल खानपासोडे, नरेंद्र नरवाडे, शुभम कडू, अभिजीत जिरापुरे, पवन खेडकर, सुशांत बडगे, पूनम सुतार, लीना भगत, मयुरी देवकाते, सुनीता पाठक, कोमल वानखडे, जयश्री गोडबोले आदींसह शेकडो कर्मचारी सहभाग झाले आहेत. दरम्यान हरतालिके निमित्त मंगळवारी कंत्राटी महिला कर्मचारी आंदोलन स्थळीच पुजा मांडणार आहेत.

