ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सणासुदीच्या काळात नारळाचे भाव भिडले गगनाला; प्रसादाचा गोडवा महागणार

अहिल्यानगर : गणेशोत्सव, नवरात्री आणि येणाऱ्या दसरा, दिवाळी सणामुळं बाजारात नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून नारळाचं उत्पन्न कमी असल्यानं नारळांचा पुरवठाही कमी झाला आहे. त्यामुळं घाऊक बाजारात दरामध्ये वाढ झाली आहे. ठोक बाजारात नारळाचे भाव हे २९०० ते ३००० रुपये शेकडा आहे. तर दिवाळीपर्यंत ही मागणी कायम राहणार असल्याचं घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितलं.

35 ते 40 रुपयांना मिळणार नारळ : प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये नारळ हे आवश्यक असते. त्यामुळं यंदा नारळामुळं ग्राहकाच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान हे भाव 20 ते 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर कधीकाळी 15 ते 20 रुपयाला मिळणारा नारळ आज 35 ते 40 रुपये किंमतीने घ्यावा लागत असल्यानं काही प्रमाणात नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. परंतु, धार्मिक कार्यात नारळाला महत्त्व असल्यानं खरेदी करावे लागते असं यावेळी ग्राहकांनी सांगितलं. महाराष्ट्रात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मद्रास, तमिळनाडू या राज्यातून प्रामुख्याने नव्या नारळाची आवक होत असते.

खोबऱ्याच्या भावात वाढ : यंदा खराब हवामान, नारळाच्या झाडांवर वारंवार पडणारी रोगराई, यामुळं नारळाचं उत्पादन कमी झालं आहे. नाराळा बरोबरच खोबऱ्याच्या भावात देखील वाढ झाली आहे. नारळाच्या भावात पाच ते पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. ठोक विक्रेत्यांकडे नारळ ३० ते ३५ रुपयांना विकत मिळत आहे, तर किरकोळ दुकानांमध्ये नारळ ३५ ते ४० रुपयांना मिळत आहे. खोबरे किरकोळ दुकानांमध्ये ४०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ठोक दुकानांमध्ये ३४० ते ३६० किलो दराने खोबऱ्याची विक्री होत आहे. त्यामुळं सध्यातरी नारळ विक्रेत्यांसह खरेदीदारांकडं कुठलेही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं नागरिकांना आगामी सर्वच सणांना नारळ हे चढ्या दरानेच खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे.

हवामान, मनुष्यबळ तसेच वाहतूक खर्चामुळं भावात वाढ : “यंदा गणेश उत्सव काळात नारळाची मागणी तेजीत आहेत, परंतु उत्पादकांकडून मालाचे भाव वाढवल्यानं किरकोळ विक्रीत देखील भाववाढ झाली आहे. यंदा पाऊस, मनुष्यबळाचा अभाव, रोगराई, वाहतूक खर्चात झालेली वाढ, या सर्वांमुळं २५ ते २६ वर्षांनंतर नारळाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत मागणी तेजीत असली तरी, आवक कमी जास्त प्रमाणात सुरु असल्यानं भावात चढ उतार सुरु राहणार आहे”, असं व्यापारी शिवाजी शेळके यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.