गणरायाच्या आगमनानं पुणे दणाणलं! मिरवणुकीत दिसल्या छत्रपती शिवरायांच्या आणि चाफेकर बंधूंच्या शौर्यगाथा
पुण्यात मानाच्या गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात नाचणाऱ्या गणेश भक्तांनी संपूर्ण शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण केलं आहे.

पुणे : गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! या जयघोषात आज (27 ऑगस्ट) संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पांचं स्वागत मोठ्या जल्लोषात व भक्तिभावानं करण्यात येत आहे. पुण्यातही मानाच्या गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात नाचणाऱ्या गणेश भक्तांनी संपूर्ण शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण केलं आहे.
या मिरवणुकीत फक्त वादन नव्हे, तर सामाजिक संदेशही दिले जात आहेत. पारंपरिक ढोलपथकांसह काही पथकांनी स्वच्छता, पर्यावरण रक्षण, महिला सन्मान अशा विषयांवर जनजागृतीपर सादरीकरण केलं आहे. यामध्ये गंधाक्ष ढोल पथकानं आपल्या सुरेख वादनानं पुणेकरांची मनं जिंकली.
चाफेकर बंधूंनी रँडचा वध केल्याचा देखावा : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुकीत ऐतिहासिक घटनांचे देखावे विशेष आकर्षण ठरत आहेत. यावेळी गंधाक्ष ढोल-ताशा पथकाच्या वतीनं क्रांतीवीर चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँडचा वध केल्याच्या ऐतिहासिक घटनेचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. या सादरीकरणात चाफेकर बंधूंचं देशभक्तिपूर्ण शौर्य, स्वातंत्र्यलढ्याशी निष्ठा आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धचा बंडखोर आवाज अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला. पुणेकरांनी या देखाव्याला भरभरून प्रतिसाद दिला.
सोबतच, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याच्या जिवंत देखाव्यानंदेखील उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक वेशभूषा, सादरीकरणातील जिवंतपणा आणि पुणेकरांचा सहभाग यामुळे मिरवणुकीचा थाट अधिकच वाढला. गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव न राहता, सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा उत्सव ठरत आहे.
केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या 133व्या वर्षीच्या गणेशोत्सवात खास उत्साहात एक अनोखी प्रतिकृती साकारली जात आहे. या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती सादर केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी मध्यप्रदेशच्या चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु, श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर, श्री श्री 1008 प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना विधीपूर्णपणे पडली.
‘या’ शुभ मुहूर्तावर गणपतीला आणा घरी : ज्योतिष शास्त्रानुसार, श्री गणपती बाप्पाच्या पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त हा आज (27 ऑगस्ट) सकाळी 11:05 वाजेपासून ते दुपारी 01:40 वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिली आहे. तर भाविकांना बाप्पाच्या पूजेसाठी अडीच तासांचा शुभ कालावधी मिळणार आहे.
- भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01 वाजून 54 मिनिटे.
- भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती: बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 03 वाजून 43 मिनिटे.
- चंद्रास्तकाल: बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 09 वाजून 27 मिनिटे.

