मराठा आंदोलनाची धग पुन्हा पेटली, मनोज जरांगे पाटलांची समर्थकांसह मुंबईकडे कूच
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. ते मुंबईत आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज (27 ऑगस्ट) बुधवारी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘आमचं आंदोलन शांततेत होणार’ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या मूळ गावी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी सांगितलं की, “आमचं आंदोलन शांततेत होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणालाही कोणतीही गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.” ते पुढे म्हणाले की, “आमचे समर्थकही शांतता आणि संयम पाळतील.”
दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मनोज जरांगे यांना त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या वेळेचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आहे. पण ते आपल्या मागण्यांवर आणि मुंबईत येण्यावर ठाम आहेत.
‘गणेशोत्सवात कोणाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊ’ “आम्हाला चिथावणी देण्याचे प्रयत्न होतील पण आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर शांततेत आमचं आंदोलन सुरू ठेवू. या काळात कितीही वेळ लागला तरी आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ,” असं त्यांनी बुधवारी सकाळी अंतरवली सराटी येथून निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. जरांगे पाटील म्हणाले की, “त्यांच्या आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोणाचीही कोणतीही गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी त्यांच्या समर्थकांकडून घेतली जाईल.
जरांगे पाटलांसोबत मराठवाड्यातील शेकडो समर्थक : मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि इतर जिल्ह्यांमधून शेकडो समर्थक सकाळपासूनच अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण एकत्र आले होते.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय? : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ‘कुणबी’ म्हणून मान्यता देण्याची मागणी करत आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावं, अशी जरांगेंची प्रमुख मागणी आहे. ‘कुणबी’ ही एक कृषीप्रधान जात असून ती सध्या इतर मागासवर्गीय (OBC) श्रेणीत समाविष्ट आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता मिळाल्यास सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

