ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

गणेशोत्सव विशेष : गोंड राजांचं स्वप्न आणि नागपूरकरांची श्रद्धा, असा आहे ‘टेकडी गणेश मंदिरा’चा शेकडो वर्षांचा इतिहास

नागपूर : या शहराची स्थापना गोंड राजे बख्त बुलंद शाह यांनी 1702 मध्ये केली आणि पुढे हे शहर भोसले घराण्याची राजधानी बनलं. या ऐतिहासिक नगरीत आजही अनेक वास्तूंमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा दडल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऐतिहासिक गणेश टेकडी मंदिर.

अशी मान्यता आहे की, गोंड राजांच्या स्वप्नात बाप्पांनी दर्शन दिल्यानंतर हे मंदिर उभारण्यात आलं. सुमारे 250 वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेल्या या गणेशमूर्तीचं आजही लाखो भाविक श्रद्धेनं दर्शन घेतात. गणेशोत्सवाच्या प्रारंभाच्या निमित्तानं, आज आपण टेकडी गणपती मंदिराची महती आणि त्यामागचा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा जाणून घेणार आहोत.

नागपूरचे ऐतिहासिक टेकडी गणेश मंदिर : टेकडी गणेश मंदिर हे विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांतील भाविकांचं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान मानलं जातं. गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त, मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी भक्तांची पावलं आपोआपच टेकडीच्या दिशेनं वळत आहेत. हे मंदिर नागपूरकरांचं आराध्य दैवत असून प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील गणपती बाप्पाची मूर्ती ही स्वयंभू असल्याचं मानलं जातं. सुमारे 250 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेलं हे मंदिर भक्तांसाठी अत्यंत पूज्य आणि श्रद्धेचं स्थान आहे.

भाविकांच्या मते, टेकडी गणपती त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारं, इच्छा फळविणारं आणि संकटांपासून मुक्ती देणारं दैवत आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात तसेच इतर शुभ प्रसंगी हजारो भक्तगण येथे दर्शनासाठी येतात.

टेकडी गणेश मंदिराचा इतिहास : नागपूरच्या टेकडी गणेश मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. गोंड राजे बख्त बुलंद शहा यांनी या मंदिराचा पाया रचला, तर पुढे राजे भोसले यांनी मंदिराचा कळस बांधल्याचं सांगितलं जातं. त्या काळात शुक्रवारी तलावाचं पाणी थेट टेकडीपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे भोसले राजे नावेतून प्रवास करून टेकडीवर येत आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेत असत.

गणपती बाप्पाची मूर्ती ही एका पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न असून ती स्वयंभू (आपोआप प्रकट झालेली) मानली जाते. प्रारंभी मंदिर हे अगदी लहान आणि साधं होतं. मात्र, काळानुरूप मंदिराचा विकास होत गेला आणि आज हे मंदिर एक भव्य धार्मिक स्थळ बनलं आहे.

 

मूर्ती ‘या’ खास कारणामुळे अतिशय दुर्मीळ : मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिणेस असले तरी, गणपतीची मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे, जी अतिशय दुर्मीळ मानली जाते. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून, तिच्या मागे एका भिंतीजवळ शिवलिंग देखील आहे, हे देखील मंदिराचं वैशिष्ट्य आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट, तर रुंदी 3 फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोकं आणि सोंड आहे. मूर्तीवर लावण्यात आलेल्या शेंदराच्या लेपामुळे तिच्या अनेक बारकाव्यांचं निरीक्षण करणं कठीण झालं असलं, तरीही भक्तीभावाने ती अत्यंत तेजस्वी वाटते.

टेकडीच्या गणपतीबद्दल माहिती : हे मंदिर टेकडीवर वसलेलं असल्यामुळे याला “टेकडी गणपती” असं नाव लाभलं. सुरुवातीला मूर्ती आकारानं खूपच लहान होती, परंतु काळानुसार ती हळूहळू वाढत गेली आणि आज मूर्तीचा आकार स्पष्टपणे मोठा दिसतो. मूर्तीच्या कपाळावर सोन्याची सजावट असून, चांदीचे इतर दागिनेही आहेत. यामध्ये मुकुट (कुंडल, हार इ.) खासकरून चतुर्थी आणि एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी ठेवले जातात. दररोज सुमारे 5 हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात, तर चतुर्थीच्या दिवशी ही संख्या 10 हजारांपेक्षा जास्त असते. टेकडी गणेश मंदिरात दिवसांतून तीन वेळा आरती होते. प्रत्येक आरतीनंतर मोदक वाटप केलं जातं, हेदेखील या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे.

आरतीच्या वेळा

  • सकाळी 6:30 वाजता
  • दुपारी 12:30 वाजता
  • संध्याकाळी 6:30 वाजता.

यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारानं जमीन मंदिराला मिळाली : टेकडी गणेश मंदिराचा परिसर भारतीय लष्करी संरक्षण दलाच्या ताब्यात होता. देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारानं मंदिर व लगतची जमीन मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर टेकडी गणपती मंदिर आणि परिसराचा विकास सुरू झाला.

 

अनेक दिग्गजांचं श्रद्धास्थान : टेकडी गणपती मंदिर हे अनेक दिग्गज व्यक्तींचं श्रद्धास्थान आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे या मंदिराचे भक्त आहेत. येथील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सचिन तेंडुलकर जेव्हा नागपूरला येतो, तेव्हा न चुकता टेकडी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतो.

‘बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली’ : टेकडी गणपती मंदिराचे पुजारी प्रदीप दत्तात्रय देव हे भारतीय लष्करातून निवृत्त झालेले आहेत. सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी टेकडी गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाप्पाकडे लष्करात सहभागी होण्याची प्रार्थना केली होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी अनेक वर्षे भारतीय लष्करात सेवा केली. निवृत्तीनंतर ते मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावत आहेत.

“गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं,” असं प्रदीप देव म्हणतात.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.