रेल्वे उड्डाणपुलाचे नवीन डिझाइन तयार; निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव
सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार; मंत्रालयात लवकरच बैठक

अमरावती : येथील राजकमल आणि जयस्तंभ चौक ते रेल्वे उड्डाणपूल यादरम्यानचा उड्डाणपूल शिकस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, हा उड्डाणपूल नव्याने साकारला जात असून या पुलाचे देखणे आणि सुंदर असे डिझाइन सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. आता निधीसाठी उड्डाणपुलाचे डिझाइन आणि अंदाजपत्रकासह प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
अंबानगरीच्या वाहतुकीचा कणा असलेला अमरावतीचा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी २५ ऑगस्ट २०२५ पासून बंद आहे. आता हा उड्डाणपूल नवनिर्मित करण्यासाठी बांधकाम विभागाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार या पुलाचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. तसेच या पुलाच्या निर्मितीसाठी लागणारा खर्चाचे अंदाजपत्रकदेखील तयार करण्यात आले आहे. आता निधी कसा उपलब्ध होईल, याकरिता जिल्हाधिकारी यासह लोकप्रतिनिधींना पुढाकार घ्यावा लागणार आहे.
येत्या काही दिवसांत राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या पुलाच्या निर्मितीसंदर्भात मंत्रालयात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी राज्य शासन आणि रेल्वे विभाग असा संयुक्तपणे निधी उपलब्ध होणार आहे. मात्र शासन कोणत्या शिर्षाखाली निधी उपलब्ध करुन देतील, याकडे प्रशासनाच्या नजरा लागल्या आहेत. अमरावतीकरांनादेखील नव्या पुलाची प्रतीक्षा आहे.
वाहतूककोंडीने त्रस्त रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने राजापेठ ते राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक या मार्गावर आता वाहतूककोंडी कायम आहे. गणेशोत्सवानंतर आता दुर्गोत्सवात भाविकांसह व्यावसायिकांना मोठा फटका बसणार असल्याचे चित्र आहे.
अमरावती रेल्वे पूल, राजकमल आणि जयस्तंभ चौक, हमालपुरा आणि रेल्वे स्थानक मार्गाला जोडणारा अप्रोच रस्त्यासह उड्डाणपुलाचे नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. उड्डाणपूल निर्मितीबाबतचा सविस्तर अहवाल आणि डिझाइन असा प्रस्ताव निधीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी एक-एक टप्पा गाठणे सुरू आहे.
श्रीकृष्ण गोमकाळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती.
‘आरओबी’ तोडण्यासाठी कन्सलटन्सी नेमल अमरावती रेल्वे स्थानकावरील ‘आरओबी’ तोडण्यासाठी रेल्वे विभागाने कन्सलटन्सी नेमली आहे. अगोदर आरओबीचा नेमका कोणात भाग पाडायचा, याचे नियोजन करण्यात आले आहे. अंदाजपत्रक तयार केले आहे. अपघात होणार नाही, त्यादृष्टीने व्यवस्थितपबणे आरओबीचा भाग तोडला जाईल, असे बडनेरा रेल्वे बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विनोद राणे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे तयार केलेले डिझाइन पाठविले आहे.
भुसावळ येथे पाठविले पुलाचे नवीन डिझाईन बांधकाम विभागाने तयार केलेल्या रेल्वे पुलाचे डिझाईन रेल्वे प्रशासनाने भुसावळ येथील वरिष्ठ बांधकाम अभियंत्याकडे मंजुरीसाठी पाठविले आहे. यात आरओबीचे डिझाईनसुद्धा समाविष्ठ करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

