दहीगाव रेचा येथे शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : दहिगाव रेचा ते पळसखेड या ग्रामीण क्रमांक १९ रस्त्यावरील कडू नाल्यावरील रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. शेतातील संत्रा, केळी, पपई यांसह इतर शेतीमाल वाहतूक करण्यास तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून शेतकरी प्रशासनाकडे वारंवार निवेदनं देत असून, रस्ता दुरुस्ती व कडू नाल्यावर पूल बांधकाम करण्याची मागणी सातत्याने करत होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळपासून दहिगाव रेचा येथे शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. “जोपर्यंत रस्ता व पूल बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील”, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
ग्रामीण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

