युद्धाच्या पार्श्वभूमीवरही जिल्ह्यात इंधन मुबलक; अफवांना बळी पडू नका – जिल्हाधिकारी आशिष येरेकर

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : मध्यपूर्व आशिया, अमेरिका तसेच युरोपमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरत असताना अमरावती जिल्ह्यात मात्र पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व इंधन वितरण यंत्रणेकडे आवश्यक तेवढा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठा, वितरण व्यवस्था आणि पुरवठा साखळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या प्रमुख तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाला दिली.
प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधनाचा पुरवठा होत असून वाहतूक व वितरण व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही. तेल कंपन्या आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सातत्याने समन्वय ठेवून साठा आणि वितरणावर लक्ष ठेवले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही भागात युद्धजन्य परिस्थिती असली तरी त्याचा स्थानिक पातळीवर तातडीने परिणाम होण्याची शक्यता नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप, गॅस वितरक आणि संबंधित यंत्रणांकडून नियमित माहिती घेतली आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी अनावश्यक घबराट निर्माण करू नये.
दरम्यान, काही ठिकाणी सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत अप्रमाणित संदेश पसरवले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच, पेट्रोल पंपांवर घाईगडबडीत किंवा अनावश्यक साठवणूक करण्यासाठी गर्दी करणे टाळावे. अशा प्रकारची कृती केल्यास पुरवठा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इंधन वितरण व्यवस्थेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून गरज भासल्यास तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केला.

