अत्याचारास विरोध केल्यानं शाळकरी मुलीची हत्या; नराधमाला अटक, संशयिताच्या घरावर जमावाची दगडफेक
घरात मृतावस्थेत आढळून आलेल्या शाळकरी मुलीची हत्या झाल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर सासपडे गावात तणावाचे वातावरण आहे.

सातारा – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना साताऱ्यातील सासपडे गावातून समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षाच्या शाळकरी मुलीवर शेजारच्याच घरातील नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने संशयिताने डोक्यात वरवंटा घालून मुलीची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर जमावाने संशयिताच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली आहे. या संतापजनक घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अवघ्या सहा तासात नराधमाला अटक – हत्या झालेली मुलगी १३ वर्षांची असून तिच्या खून प्रकरणी राहुल यादव (वय 34) या नराधमाला स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली. सासपडे (ता. सातारा) गावात हत्या झालेल्या मुलीचे कुटुंबीय राहतात. त्यांची मुलगी शुक्रवारी दुपारी घरी आली होती. तिने वडिलांकडून चावी घेऊन दार उघडले. काही वेळानंतर भाऊ घरी आला असता आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याला दिसली.
घरात आढळली रक्ताच्या थारोळ्यात – बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तिच्या भावानं घराच्या पाठीमागील शेतात असलेल्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या तरुण मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सासपडे गावामध्ये एकच खळबळ उडाली होती. एलसीबी आणि बोरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सहा तासातच नराधमाला ताब्यात घेतलं.
संशयिताच्या घरावर जमावाची दगडफेक – मुलीचा मृतदेह शनिवारी सकाळी सासपडे गावातील तिच्या घरासमोर आणल्यानंतर मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने नराधमाला ताब्यात देण्याची मागणी करत त्याच्या घरावर दगडफेक करत घरावरील पत्रे उचकटून टाकले. तणाव निर्माण झाल्याने साताऱ्यातून पोलीस फौजफाटा मागवण्यात आला. वर्षभरापूर्वी अशीच घटना घडली होती. त्याचा तपास करून नराधमाला अटक केली असती तर या मुलीचा बळी गेला नसता, अशी संतप्त भावना जमावातून व्यक्त होत होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर भलताच प्रसंग उद्भवला असता.
सासपडे गावात तणावपूर्ण शांतता – हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याची ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला. तणावपूर्ण आणि शोकाकूल वातावरणात मृत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून सासपडे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
संशयितावर आधीच दाखल आहे पोक्सोचा गुन्हा – या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नराधम राहुल यादव याच्यावर आधीच पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी एका मुलीचा विहिरीत मृतदेह आढळून आला होता. तिची हत्या याच नाराधामाने केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करणार आहेत.

