देवेंद्र फडणवीसांचा बच्चू कडूंवर ‘प्रहार’; मंत्रालयाशेजारील प्रहार जनशक्ती पक्षाला कार्यालयासाठी दिलेली जागा घेतली परत
शिवसेनेतील फुटीनंतर तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडूंच्या पक्षासाठी ही जागा देऊ केली होती.

मुंबई : भाजपासह महायुती सरकारवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘प्रहार’ केला आहे. कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मंत्रालयाजवळ पक्ष कार्यालयासाठी दिलेली जागा परत घेण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडूंच्या पक्षासाठी ही जागा देऊ केली होती.
JDU ला पुन्हा जागा परत करण्याचा निर्णय : मंत्रालयाजवळील योगक्षेमसमोर जनता दल सेक्युलर पक्षासाठी 909 चौरस फूट जागा राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती. यापैकी 200 चौरस फूट जागा JDU साठी ठेवून उर्वरित 700 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारने प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी दिली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयात बदल करत JDU ला पुन्हा जागा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे बिहार विधानसभा निवडणुकीतील गणितं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
नेमकं कारण काय? : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. यानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषवले. पुढे शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि शिंदे सरकारमध्येही त्यांचा प्रभाव दिसून आला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांनी राजकीय भूमिका बदलत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत तिसरी आघाडी स्थापन केली. या निवडणुकीत त्यांनी महायुतीला थेट आव्हान दिले, परंतु त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता बच्चू कडू महायुती किंवा एकनाथ शिंदेंसोबत नसल्यानं त्यांचा मर्यादित राजकीय प्रभाव लक्षात घेऊन पक्ष कार्यालयाची जागा काढून घेण्यात आल्याचे समजते.
बच्चू कडूंची तिखट प्रतिक्रिया : मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून बच्चू कडू यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, “साप जसा दूध पाजल्यावरही विष सोडतो, तसा भाजपा आहे. ते कधी उलटे पलटून विष सोडतील हे सांगता येत नाही. मी भारतीय आहे, असं म्हणण्यापेक्षा मी भारतीय जनता पक्षाचा आहे, असं म्हटलं तरच तुम्ही टिकाल, अशी स्थिती त्यांनी करून ठेवली आहे”, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

