वरिष्ठांसह लोकप्रतिनिधींची डोळेझाक ग्रामीण भागातून आलेले लोक ताटकळले

सालई खुर्द : मोहाडी पंचायत समिती कार्यालयात कर्मचार्यांवर कोणाचाच अंकुश उरला नाही की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. दि. ८ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यानंतरही सायंकाळ ६ वाजेपर्यत जवळपास ९५ टक्के खुर्च्या रिकाम्याच होत्या. कर्मचार्यांच्या या लेटलतीफपणामुळे ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेले लोक मात्र, पंचायत समितीच्या आवारातच ताटकळत थांबले होते.
राज्य सरकारने कर्मचार्यांची सततची मागणी विचारात घेऊन पाच दिवसांचा आठवडा आणि मुख्यालयी वास्तव्य करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे उर्वरित पाच दिवस कार्यालय सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत चालते. असे असतांनाही मोहाडी पंचायत समितीतील अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करीत नाहीत. बहुतांश जण जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. मात्र दुसरीकडे घरभाडे भत्ता उचलला जातो. याला ना वरिष्ठ अधिकारी कात्री लावण्याचे धाडस दाखवितात ना संबंधित कार्यालयीन प्रमुख. त्यामुळे लेटलतीफपणाची सवय अंगवळणी पडलेल्या कर्मचार्यांचे मनोबल उंचावत आहे. त्याचाच प्रत्यय आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळ पासूनच अधिकारी कर्मचार्यांनी दांडी मारली आहे.
नागरिकांना माहिती विचारली असता सकाळ पासूनच अधिकारी आले. मात्र एका कर्मचार्याचा साखरपुडाच्या कार्यक्रमात सर्व कर्मचारी गेले असल्याने पं. स. कार्यालय वार्यावर सोडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. सव्वादहा वाजून गेल्यानंतरही कार्यालयातील जवळपास ९० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. सकाळी तातडीने कार्यालयात जाऊन काम आटोपले जावे, म्हणून अनेक ग्रामस्थ कार्यालय उघडण्यापूर्वी आवारात उपस्थित होते. मात्र त्यांना रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घ्यावे लागले. काही बहाद्दर तर सकाळी ११ वाजले तरी कार्यालयात आले नव्हते. याबाबत कार्यालयीन गटविकास अधिकारी हरीनखेडे यांना फोनद्वारे संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
कर्मचारी हजर राहत नसम्याने त्यांच्या नावासमोर गैरहजर असल्याचा शेरा मारण्यात यावा. संबंधित कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावा. आतापर्यंत एकही कर्मचार्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्या आली नाही. गैरहजर असणार्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर वरीष्ठ अधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

