महत्वाचे

निवडणुकीतून महसूल वाढीचा ‘बूस्टर डोस’ — दोन दिवसांत रेकॉर्ड वसुली

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे दर्यापूर नगर परिषद आणि जीवन प्राधिकरण (पाणीपुरवठा विभाग) यांच्या तिजोरीत विक्रमी कर वसुली झाली आहे. उमेदवारांना अर्ज भरताना आवश्यक असणारे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी थकबाकी भरणे बंधनकारक असल्याने, अनेक नागरिकांनी स्वतःहून थकीत घरकर आणि पाणीबिलाची रक्कम भरली आहे.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध विभागांकडून NOC सादर करावी लागते. त्यात नगर परिषदेचा घरकर विभाग आणि जीवन प्राधिकरणाचा पाणीकर विभाग महत्त्वाचा मानला जातो. नियमानुसार, उमेदवाराच्या नावावर कोणतीही थकबाकी नसावी. त्यामुळे निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी तत्काळ आपली थकीत देयके भरण्याची मोहीम हाती घेतली आहे.

दोन दिवसांत ₹१४ लाख १० हजारांची वसुली!

या प्रक्रियेमुळे नगर परिषद आणि जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पैसे भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीवन प्राधिकरणाने पाणीकरापोटी तब्बल ₹४ लाख १० हजारांची रक्कम जमा केली आहे, तर नगर परिषदेच्या घरकरातून केवळ दोन दिवसांत ₹१० लाखांची विक्रमी वसुली झाली आहे.

विशेष म्हणजे, ज्या कर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना वर्षभर प्रयत्न करावे लागतात, तोच कर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भरला आहे. या निवडणूक काळातील वसुलीमुळे प्रशासनाच्या महसूल संकलन मोहिमेला “निवडणूक बूस्टर” मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.