उपेक्षित ते सन्मानित : संक्रांतीतून उमलले मानवतेचे खरे रूप

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : समाजात अनेक वर्षांपासून रूढ असलेल्या काही प्रथांमुळे एकल पालक महिलांना सण-समारंभांपासून दूर ठेवले जाते. या पार्श्वभूमीवर पंतजली योग समिती व लोकजागर परिवाराच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथे एकल पालक महिलांसाठी विशेष तिळगुळ व सन्मान स्नेहमिलन व हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक संवेदनशीलतेचा नवा संदेश समाजासमोर ठेवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. संगीता गोविंद मेण आणि सामाजिक सेविका आशाताई दाभाडे यांनी पुढाकार घेतला. पतीच्या निधनानंतर महिलांना समाजाकडून अनेकदा दुय्यम वागणूक दिली जाते. शुभकार्यांमध्ये त्यांना वगळले जाते, जणू काही त्यांनी काही गुन्हा केला आहे अशी वागणूक दिली जाते. प्रत्यक्षात मात्र त्या आपल्या कुटुंबासाठी दुहेरी जबाबदारी सांभाळत असतात. मुलांना आईबरोबरच वडिलांचे प्रेम देत, संघर्षमय आयुष्य जगत असलेल्या या महिलांच्या भावनांना मान देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे डॉ. मेण यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पारंपरिक तिळगुळ देत महिलांना सन्मानाने हळदीकुंकू लावण्यात आले. अनेक महिलांसाठी हा अनुभव अत्यंत भावनिक ठरला. समाजाने दिलेल्या उपेक्षेच्या वेदना मनात साठवून ठेवलेल्या महिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. काही महिलांनी तर कार्यक्रमादरम्यान आपले अनुभव व्यक्त करताना ढसाढसा रडत मन मोकळे केले.
या उपक्रमात समाजसेविका आशाताई दाभाडे,मिना दिलीप अंबुलकर, आशाताई सुधीर वानखडे दाभाडे, संगीता उके, शोभा थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठी मढी महिला योग वर्ग, माळीपुरा सुर्जी यांचे सहकार्य लाभले. तसेच राधेश्याम मंडप डेकोरेशन, सुर्जी – प्रशांत दादा पवार यांनी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली. पंतजली योग समिती व लोकजागर परिवारातील मैत्रिणींनीही मोलाचे सहकार्य केले.
हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, समाजातील भेदभावी विचारसरणीला प्रश्न विचारणारा आणि एकल पालक महिलांना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान देण्याचा प्रयत्न ठरला. उपस्थित महिलांनी अशा कार्यक्रमांची परंपरा सुरू राहावी, अशी भावना व्यक्त केली.

