सरफापूर ग्रामपंचायत हद्दीतील पांदण रस्त्याच्या कामावर नागरिकांचे गंभीर आरोप; निकृष्ट कामाबाबत चौकशीची मागणी

-प्रतिनिधी चांदुर बाजार : सरफापूर ग्रामपंचायत अंतर्गत हनुमान मंदिर ते खारोणे वाडी दरम्यान सुरू असलेल्या अंदाजे दोन किलोमीटर लांबी व सुमारे 26 फूट रुंदीच्या पांदण रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जा व अनियमिततेचे आरोप करत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर रस्ता पूर्वीच्या शिरजगावकसबा जिल्हा परिषद सर्कलमध्ये येत असून तो सरफापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. या रस्त्याचे काम ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे काम ठेकेदार राऊत यांना देण्यात आले असून कामाचा दर्जा अपेक्षित निकषांप्रमाणे नसल्याचा आरोप होत आहे. काही नागरिकांचा दावा आहे की रस्त्याची रुंदी काही ठिकाणी कमी-जास्त करण्यात आली असून लगतच्या नालीलाही हानी पोहोचल्याचे दिसून येते.
या संदर्भात नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांदूर बाजार येथील पदाधिकारी अक्षय घुलक्षे तसेच युवास्वाभिमानचे राजूभाऊ कश्यप यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीनंतर घुलक्षे व कश्यप यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, कामाच्या दर्जाबाबत त्यांनी ठेकेदार राऊत यांच्याशी चर्चा केली असता वादाची परिस्थिती निर्माण झाली आणि ठेकेदाराने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तथापि, या आरोपांवर ठेकेदार राऊत यांची अधिकृत भूमिका मिळू शकलेली नाही.
स्थानिक कास्तकारांच्या मते, या पांदण रस्त्याचा वापर दररोज हजारो शेतकरी व नागरिक करत असतात. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून जाणे कठीण होते. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काहींनी सरपंचांच्या भूमिकेबाबतही शंका व्यक्त केली आहे; मात्र यासंदर्भात ग्रामपंचायतीची अधिकृत बाजू समजू शकलेली नाही.
अक्षय घुलक्षे व राजूभाऊ कश्यप यांनी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचा इशारा दिला असून, कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखली जावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित यंत्रणेकडून या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याने प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

