तांत्रिक कामांमुळे दोन शहरासह ,७९ व १५६ गावांचा पाणीपुरवठा राहणार बंद; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहानूर मध्यम प्रकल्पावर तांत्रिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने ७९ व १५६ गावे तसेच अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर या दोन शहरांचा पाणीपुरवठा सलग दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार असल्याची महत्त्वाची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.
मध्यम व लघु पाटबंधारे उपविभाग, अचलपूर यांनी दिलेल्या पत्रानुसार शहानूर धरण परिसरात वीज निर्मिती यंत्रणेसंदर्भातील पुनर्स्थापना व आवश्यक दुरुस्तीचे काम तातडीने करणे गरजेचे असल्यामुळे दि. ६ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर थेट परिणाम होणार आहे.
या योजनेवर अवलंबून असलेल्या शेकडो गावांमध्ये घरगुती वापर, शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाने तसेच लघुउद्योगांसाठी पाणीपुरवठा होतो. मात्र या तात्पुरत्या बंदमुळे नागरिकांना पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दर्यापूर जल व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. विजय शेंडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा. विशेषतः रुग्णालये, शासकीय संस्था आणि मोठ्या वसाहतींनी पर्यायी नियोजन करून घ्यावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही कामे भविष्यातील अखंड आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी अत्यावश्यक आहेत. दुरुस्ती पूर्ण होताच नियमित पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींनीही नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवून पाण्याच्या योग्य नियोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

