ग्राम सडक योजनेंतर्गत निर्मित तिवसा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था
गावांच्या विकासाला बसली खीळ

तिवसा : तालुक्यातील जावरा, फत्तेपूर, करजगाव, नमस्कारी, ममदापूर या गावांतील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या गावातील वर्धा नदीमुळे महाराष्ट्र शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळतो; पण गावाला तालुक्याशी जोडणारा एकमेव रस्ता मात्र दुर्लक्षित आहे. आज रस्त्याची अवस्था पाहिली तर धड पायीसुध्दा चालता येत नाही. गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. पर्यायाने गावाच्या विकासाला खीळ बसली आहे.
गावात सातव्या वर्गापर्यत, तर काही गावामध्ये चवथीपर्यंत शाळा असल्यामुळे पुढील शिक्षणाकरिता तालुक्याच्या ठिकाणी (तिवसा) जावे लागते; पण खराब रस्त्यामुळे व अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आरोग्याच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे रात्री-बेरात्री तालुक्याला उपचारासाठी जाण्याकरिता व्यत्यय येऊन वेळ लागतो. त्यामुळे आजारी व्यक्ती दगावण्याची भीतीपण असते. यामुळे गावातील लोकांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. लोकांचे आरोग्य व शिक्षण, जीवनमान धोक्यात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता ९ सप्टेंबर २०२४ला मंजूर करण्यात आला आहे आणि हा सिमेंट रस्ता thin white topping (TWT) आहे; परंतु आज १ वर्ष झालं तरी काहीही उपाययोजना झाली नाही. संबंधितांनी अडचणी दूर करून आमच्या गावातील रस्ता करावा.
शासनाला करोडो रुपयांचा महसूल देणाऱ्या गावांना एक चांगल्या दर्जाच्या रस्त्याची अपेक्षा माय-बाप सरकारकडून जावरा येथील प्रफुल्ल रामपुरे व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

