कॉक्लियर इम्प्लांटनंतर ‘स्विच ऑन’ अडीच वर्षाच्या बालिकेने पहिल्यांदाच ऐकला आवाज.

स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,) अमरावती येथे दुसऱ्यांदा जन्मजात मूकबधिर असलेल्या अडीच वर्षाच्या बालिकेवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया 11 नोव्हेंबर 2025 रोजी यशस्वीपणे पार पडली व त्यानंतरच्या ‘स्विच ऑन’ (Sound Processor Activation) प्रक्रियेद्वारे बालिकेने पहिल्यांदाच आवाज ऐकला, हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत आनंददायक ठरला. सदर बालिका ही रा.आमला विश्वेश्वर ता. चांदुर रेल्वे, जि.अमरावती येथील आहे.
या शस्त्रक्रियेची ‘स्विच ऑन’ प्रक्रिया साउंड प्रोसेसर ऍक्टिव्हेशन करण्यात आले . यावेळी बालीकेने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हृदयस्पर्शी होता.या प्रक्रियेनंतर पुढील दोन वर्षे रुग्णाने नियमितपणे ऑडिओलॉजिस्टच्या संपर्कात राहिल्यास बोलणे शिकणे सुलभ होईल, अशी माहिती तज्ञांनी दिली. सदर रुग्ण ही दोन वर्षावरील असल्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमार्फत उपचार मिळू शकत नव्हता म्हणून ही शस्त्रक्रिया जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे करण्यात आली आहे.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जीवन वेदी (नाक,कान, घसा तज्ञ,विभाग प्रमुख, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर), रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी तसेच नाक, कान, घसा तज्ञ डॉ.मंगेश मेंढे,ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपीस्ट लक्ष्मण मोरे, औषध निर्माण अधिकारी योगेश वाडेकर यांचे शस्त्रक्रियेसाठी विशेष योगदान राहिले.या यशस्वी आणि दुर्मीळ शस्त्रक्रियेमुळे एका बालकाच्या आयुष्यात अमूल्य बदल घडून आला आहे. या कार्यक्रमाला डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. जयश्री पुसदेकर, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)शितल बोंडे, ऋषिकेश धस, कार्यालयीन अधीक्षक श्रीकांत इखे, गुल्हाने आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.गरीब व गरजू रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत आधुनिक व महागड्या उपचार सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.

