महाराष्ट्र

शासन निर्णयाला खुलेआम आव्हान! महिला आर्थिक विकास महामंडळात कार्यालयातच वाढदिवसाचा सोहळा

अमरावती(विशेष प्रतिनिधी) : शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त, तटस्थता व नियमपालन अपेक्षित असताना महिला आर्थिक विकास महामंडळ, अमरावती येथे घडलेला प्रकार प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. शासनाने स्पष्ट आदेश देऊन कार्यालयीन ठिकाणी वाढदिवस, सत्कार, समारंभ साजरे करण्यास मनाई केली असतानाही या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या व्यवस्थापक आढावा बैठकीदरम्यान ऋषीकेश घ्यार, सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी (ADCO), अमरावती यांचा वाढदिवस कार्यालयातच साजरा करण्यात आला. हा प्रकार साधा औपचारिक नव्हे, तर शासन निर्णयाची उघड पायमल्ली करणारा असल्याचे स्पष्ट दिसून येते.

महत्त्वाचा प्रश्न असा की, हा वाढदिवस कुणाच्या आदेशाने किंवा परवानगीने साजरा करण्यात आला?
जर परवानगी घेतली असेल तर ती कोणत्या सक्षम अधिकाऱ्याने दिली, आणि जर परवानगीशिवाय झाला असेल तर संबंधितांनी शासन नियमांना का धाब्यावर बसवले, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

या वेळी दिनेश शर्मा (लेखाधिकारी), रंजन वानखेडे (DCO), शुभम गुल्हाने (वर्ग–४ कर्मचारी) तसेच स्वतः ऋषीकेश घ्यार (ADCO) यांची उपस्थिती होती. वरिष्ठ व जबाबदार पदावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच नियमभंग झाल्याने, हे कृत्य अधिक गंभीर स्वरूपाचे ठरत आहे.

शासन निर्णय फक्त कागदापुरतेच आहेत का?
सामान्य कर्मचाऱ्यांवर नियमांची सक्ती आणि वरिष्ठांसाठी मोकळीक, अशी दुहेरी भूमिका प्रशासनात रुजत आहे काय, असा रोखठोक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अशा घटनांमुळे शासकीय यंत्रणेतील शिस्त, पारदर्शकता व नैतिकता यांवर जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार का, की हा प्रकारही इतर अनेक नियमभंगांप्रमाणे दुर्लक्षित केला जाणार, याकडे आता कर्मचारी वर्गासह जनतेचेही लक्ष लागले आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर त्यांची अंमलबजावणीही तितक्याच कठोरपणे होणे अपेक्षित आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.