ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अमरावतीत महापालिका निवडणुकीत महायुती होणे कठीण; भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं स्वतंत्र सेटिंग

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Amravati Municipal Elections) भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना स्वतंत्र सेटिंग लावण्याच्या तयारीत आहेत.

अमरावती : राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणूकही महायुतीनं (Amravati Municipal Elections) मिळून लढण्याचा निर्णय घेतला असताना, अमरावतीत मात्र या तिन्ही पक्षाची महायुती होणं कठीण असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं फार पूर्वीपासूनच आपण स्वतंत्र लढणार अशी भूमिका जाहीर केली होती. आता शिवसेना पण त्याच विचारात आहे. तर भाजपा सोयीनुसार काहीच जागा सोडण्याच्या तयारीत असल्यानं महायुतीत असणाऱ्या साऱ्यांनी आपलं स्वतंत्र सेटिंग लावण्याची तयारी सुरू केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरच लढणार : अमरावतीच्या राजकारणात विधानपरिषद सदस्य संजय खोडके आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिका निवडणुकीत रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष भाजपासोबत राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत राहणार नाही. आता शहरातील सर्व ८७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असं संजय खोडके ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना म्हणाले. प्रत्येक प्रभागात दोन ते तीन सक्षम उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाली असून काही दिवसातच उमेदवारांची यादी घोषीत केली जाईल. यावेळी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस अमरावतीत सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वासही संजय खोडके यांनी व्यक्त केला.

 

जागावाटपावर शिंदेंची शिवसेना नाराज : भाजपाकडून आलेल्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं चित्र आहे. भाजपाकडून अत्यंत कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्यानं ही युती मान्य होणारी नाही असे संकेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना दिले. आम्हाला जितक्या जागा हव्या आहेत तितक्या जागा आमच्यासह युवा स्वाभिमान पार्टीला विभागून देण्याचा भाजपाचा विचार आहे. आम्हाला हे मान्य नाही. आम्ही स्वतंत्रपणे सर्व जागा लढण्यास तयार आहोत. विशेष म्हणजे ज्यांना कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळणार नाही अशा अनेकांची पहिली पसंती ही शिवसेनेचा धनुष्यबाण आहे असं ज्ञानेश्वर धाने पाटील म्हणाले.

भाजपाकडे ६४१ इच्छुक उमेदवार : आमचा पक्ष कायम ऍक्शन मोडमध्ये असतो. आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. इच्छुक उमेदवारांचा मोठा ओघ भाजपाकडे असून एकूण ६४१ इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार शिंदेंची शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षासोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे. नेमक्या किती जागांचे वाटप होईल यावर अद्याव काहीही स्पष्टता नाही. एक दोन दिवसात बैठक घेऊन जागा वाटपाचं काय ते ठरवू असं, भाजपाचे शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना म्हणाले.

२०१७ च्या निवडणुकीत असं होतं चित्र : २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत एकूण ८७ जागांपैकी भाजपा हा पक्ष सर्वाधिक ४५ जागा घेऊन बहुमतात राहिला. त्यावेळी आज काँग्रेसचं नेतृत्व करणारे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपानं मोठी बाजी मारली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि अमरावतीच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके मागच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये होत्या. खोडके यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे एकूण १६ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला केवळ ७ जागा राखता आल्या आणि एआयएमआयएमचे १० नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.

 

मागच्या निवडणुकीत अशी होती संख्या

एकूण जागा : ८७
भाजपा : ४७
काँग्रेस : १६
शिवसेना :०७
एआयएमआयएम : १०
राष्ट्रवादी काँग्रेस : ००
इतर : ०७

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.