महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचं मुंबईत उद्घाटन, तीन दिवस विविध विषयांवर होणार मंथन
महाराष्ट्र स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्ष झाल्यानं मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये येत्या २०, २१ आणि २२ डिसेंबरला राज्यव्यापी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई : समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांवर थेट आणि स्पष्टपणे चर्चा व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या सहकार्यानं 20, 21 आणि 22 डिसेंबर रोजी राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली. “अजूनही मी खेड्यांमध्ये कामानिमित्त जाते. त्याआधी मला त्या गावाशी संबंधित आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्या नावांची यादी दिली जाते. गावात गेल्यानंतर महिला सरपंच समोर दिसतच नाही. त्या कुठं आहेत असं विचारलं असता महिलेचा पतीच समोर येतो. आपण कधी महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणार आहोत? असा प्रश्न करत खासदार सुप्रिया सुळे यांनी परिषदेचं उद्धाटन केलं.
महिला धोरण दालन मुंबईत खुलं : महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या महिला धोरणाचा प्रवास उलगडणारं ‘महिला धोरण दालन’ शनिवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये खुलं करण्यात आलं. महिला चळवळीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय महिला परिषदेत या दालनाचं अनावरण आणि संबंधित पुस्तिकाचं प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मानवाधिकार कार्यकर्त्या इंदिरा जयसिंग आणि सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका पद्मश्री डॉ सय्यदा हमीद उपस्थित होत्या.
…ते एकून आम्ही सुन्न झालो : “आपण तीन वर्ष राष्ट्रीय महिला परिषदेच्या सदस्या म्हणून काम केलं आहे. यादरम्यान गडचिरोली इथं आदिवासी महिलांनी जंगल आणि शेतीतून मिळणाऱ्या वस्तूंच्या यशस्वीपणे केलेल्या व्यवसायाबाबत आणि मालेगावमधील दंगलीचा रिपोर्ट तयार केला होता. त्यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाचा थेट संपर्क पंतप्रधान आणि सर्व मंत्र्यांसोबत असायचा. पण आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या कामाबद्दल न बोललेलं बरं. याशिवाय त्यानंतर 2002 गुजरात दंगलीचा रिपोर्ट मी आणि 5 महिलांनी मिळून बनवला. तेव्हा त्या महिलांनी अनुभवलेले बलात्कार, विनयभंग आणि भयंकर रक्तपात आम्हाला जसेच्या तसे सांगितले होते. ते एकूण काही दिवस आम्ही सुन्न झालो होतो असं डॉ सय्यदा हमीद यांनी सांगितलं.
मान्यवरांचं लाभणार मार्गदर्शन : “22 डिसेंबरला परिषदेच्या शेवटच्या दिवशी अहवाल सादरीकरण, ठराव जाहीरनामा आणि पुढील वाटचालीचा आराखडा मांडण्यात येणार आहे. विविध राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्या, अभ्यासक आणि सामाजिक चळवळीतील प्रतिनिधी आपले अनुभव शेअर करतील. या कार्यक्रमादरम्यान जावेद अख्तर, शमा दलवाई, कुमार केतकर, डॉ. प्रज्ञा दया पवार यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे,” अशी माहिती शुभदा देशमुख यांनी दिली.

