देश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

जंगलाच्या कुशीतून रंगमंचावर झेप; बेलखेडाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी कलेला दिले नवे पंख

-शंतनू इंगळे (प्रतिनिधी) : दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी तालुकास्तरीय क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सवाचा मंच केवळ स्पर्धांचा साक्षीदार न राहता, लोकसंस्कृतीच्या तेजस्वी आविष्काराने भारावून गेला. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या बेलखेडा या छोट्याशा आदिवासी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने या महोत्सवाला आत्मा बहाल केला.
निसर्गाच्या सान्निध्यात घडलेली, मातीच्या संस्कारातून उमललेली ही चिमुकली कलाकार मंडळी जेव्हा रंगमंचावर उतरली, तेव्हा सातपुड्याच्या वाऱ्याचा गंध, जंगलातील ढोलांचा नाद आणि आदिवासी जीवनशैलीची लय सभागृहात दरवळू लागली. पारंपरिक वेषभूषा, ठेका धरलेली पावले, चेहऱ्यावरील उत्स्फूर्त भाव आणि तालबद्ध हालचाली यांतून आदिवासी संस्कृतीचा इतिहास, संघर्ष आणि आनंद एकाच वेळी प्रेक्षकांसमोर उभा राहिला.
प्रत्येक ठेक्यावर प्रेक्षकांची दाद वाढत गेली. नृत्याच्या प्रत्येक टप्प्यावर टाळ्यांचा गजर, शिट्यांचा आवाज आणि कौतुकाची उस्फूर्त हाक ऐकू येत होती. हा कार्यक्रम पाहताना अनेकांना लोककलेची खरी ताकद आणि ग्रामीण प्रतिभेची खोली नव्याने जाणवली. हा केवळ नृत्यप्रकार नव्हता, तर पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या संस्कारांची, परंपरेची आणि अस्मितेची अभिव्यक्ती होती.
या संस्मरणीय क्षणी अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट, शिक्षण विस्तार अधिकारी राम चौधरी, केंद्रप्रमुख, विविध विभागांचे अधिकारी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता बोबडे, शिक्षक श्री. शंकर बिजवे, सौ. रेखा कावलकर, मंगलीबाई, कु. सरिता दौड, कु. कल्पना अलोकार, श्री. सुधाकर केंद्रे, सौ. रंजना खरड, कु. योगिना जहांडेकर, उपसरपंच शालिकराम बेठे आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमानंतर बेलखेडा शाळेच्या कु. भावना शालिकराम बेठे, अंजली सुरेश भुसूम, दिव्या राजेश भुसूम, अनुष्का अनिल दारशिंम्भे, रागिनी गणेश पाटणकर, देविका आकाश भुसूम, अपर्णा शालिग्राम बेठे, प्रतीक्षा राजू साकोम या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवासाठी निवड झाल्याची घोषणा होताच सभागृहात आनंदाचे वातावरण पसरले. उपस्थित मान्यवरांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बेलखेडाच्या या चिमुकल्यांनी हे सिद्ध करून दाखवले की, कला ही शहरांच्या चौकटीत अडकलेली नसून ती गावखेड्यांच्या मातीमध्येही तितकीच समृद्ध आहे. योग्य मार्गदर्शन, शिक्षकांचे कष्ट आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांचा संगम झाला, तर सातपुड्याच्या कुशीतूनही जिल्हा नव्हे तर राज्यस्तरीय मंचावर झळकणारे कलावंत घडू शकतात. हा सांस्कृतिक विजय बेलखेडा गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.