ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पतंग उडवण्याआधी हायकोर्टाचा ‘हा’ आदेश नक्की वाचा! नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

मकरसंक्रात जवळ येत असल्याने यानिमित्ताने पुन्हा एकदा आकाशात पतंगी भरारी घेताना दिसतील. मात्र पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेकदा दुर्घटना होतात.

तसंच काही पक्ष्यांनाही आपला जीव गमवावा लागतो. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये काहींना जीवही गमवावा लागला आहे. याची दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.

नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेत जनहित याचिका दाखल केली. यावेळी पतंगीला नायलॉन मांजा आढळल्यास 50 हजारांचा दंड आकारावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. नायलॉन मांजा विक्री आणि निर्यातीसाठी 2.5 लाखांचा दंड का लावू नये, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केली आहे.

हायकोर्टाने यावेळी पोलीस प्रशासन कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने तीव्र नाराजी जाहीर केली. तसंच 27 डिसेंबरपर्यंत सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, अल्पवयीन तरुण किंवा तरुणींकडे नायलॉन मांजा आढळल्यास पालकांवरही 50 हजार दंड प्रस्तावित आहे. नायलॉन मांजामुळे घटना घडल्यास पोलीस उपायुक्त आणि अधीक्षक जबाबदार धरले जाणार आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे. आक्षेप नसल्यास दंडात्मक नियम लागू होणार असल्याच्या नागपूर खंडपीठाच्या स्पष्ट सूचना आहेत.

नायलॉन मांजाचा साठा जप्त

इंदूरहून छत्रपती संभाजीनगर शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाचा साठा आणला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंदूरमधून आलेल्या नायलॉन मांजाच्या 288 रिळांचे सहा बॉक्सचे पार्सल येताच गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे ऋतिक दिलीप लोधे आणि गणेश रामकिसन औताडे अशी आहेत. ही कारवाई शहरातील बन्सीलालनगर परिसरात करण्यात आली.

मनमाडमध्ये महिला डॉक्टर जखमी, चेहऱ्यावर करावी लागली शस्त्रक्रिया

नाशिकच्या मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आल्याने नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्त्री रोग तज्ञ असलेल्या डॉक्टर विद्या योगेश मगर नेहमी प्रमाणे दुचाकीवरून क्लिनिकमध्ये जात असताना ईदगाह भागातील पुलावर अचानक नायलॉन मांजा चेहऱ्यावर आला. त्यामुळे त्यांचा डावा डोळा थोडक्यात बचावला तर चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांच्यावर कॉस्मेटिक सर्जरी करून 25 टाके टाकण्यात आले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.