जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यदलाचं ‘ऑपरेशन महादेव’; दोन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यात सुरक्षा दलानं सोमवारी सुरू केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार केलं. गुप्तचर माहितीनुसार दहशतवादविरोधी कारवाई सुरू करण्यात आली

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या दाचिगाम भागात सुरक्षा दलानं ‘ऑपरेशन महादेव’ मोहिम राबवून २ दहशतवाद्यांना ठार केलं. हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्यानं आणि कारवाईखालील भूभाग कठीण असल्यानं घटनास्थळी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू असताना सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना ठार करून मोहिम फत्ते केली आहे. उल्लेखनीय बाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज माध्यमांशी बोलताना पहलगाममधील दहशतवाद्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईची माहिती समोर आली आहे.
सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर शहरातील हरवन भागातील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाच्या वरच्या भागात सोमवारी दहशतवादविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. सैन्य दल, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलानं जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांनी तयार केलेलं वातावरण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी संपूर्ण परिसरात आक्रमकपणे दहशतवादविरोधी मोहिम सुरू केली आहे.
सुरक्षा दलाकडून परिसरात शोध घेत असताना दूरवरून दोन गोळीबाराचे आवाज ऐकू आले. संशयित ठिकाणी पोहोचल्यानंतर सुरक्षा दलांनी गोळीबार सुरू केला. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं. या भागात आणखी दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कारवाई तीव्र करण्यासाठी अतिरिक्त दल देखील या भागात पाठवण्यात आलं आहे.
तीन महिन्यांपासून दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहिम- २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरू आहे. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी पहलगामध्ये निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता. या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. भारतानं मे महिन्याच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूर राबवून सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवर नियोजित हल्ला केला होता.
भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या नागरिकांना लक्ष्य केलं नव्हतं. मात्र, पाकिस्ताननं जम्मू विभागातील पूंछ जिल्ह्यात सैन्य दल आणि नागरी सुविधांना लक्ष्य केले होते. तसेच सीमेनजीक असलेली अनेक घरे, इतर खासगी मालमत्ता आणि धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली होती. यात एक मंदिर, एक गुरुद्वारा आणि एक चर्च यांचा समावेश होता.

