राजकारण, क्रिकेटनंतर रोहित पवार कुस्तीच्या आखाड्यात; कुस्तीचा वाद शमणार की पेटता राहणार?
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अहिल्यानगर Rohit Pawar : महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे. त्यांच्यासह सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
रोहित पवारांची बिनविरोध निवड : महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे. दोन वर्षांपूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या घेऱ्यात अडकलेल्या या संघटनेची निवडणूक आणि वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद वैध याचा वाद थेट कोर्टात पोचला होता. अखेर रविवारी पुण्यात वारजे इथं महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यात आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष : आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर सलग तीन वेळा एमपीएल यशस्वीपणे भरवून राज्याच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं. तसंच गेल्यावर्षी अहिल्यानगर इथं महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत वाद झाल्यानं आणि या स्पर्धेच्या एकूणच वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेनं कर्जत इथं 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या भरवली होती. आता तर त्यांनी कुस्तीगिर परिषदेच्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर मजल मारली आहे.
शरद पवार 40 वर्ष होते अध्यक्ष : स्व. मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेची मुहूर्तमेढ रोवली आणि शरद पवार चाळीस वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक पैलवानांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. विविध पदकं प्राप्त केलेल्या अनेक गुणवान पैलवानांना शासनामध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. क्रिकेटमध्ये रोहित पवारांनी ज्याप्रमाणे एमपीएलचा यशस्वी प्रयोग करुन राज्यातील होतकरु क्रिकेट खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं त्याचप्रमाणे आता कुस्तीमध्ये ते कोणता प्रयोग करतात, याकडे राज्याच्या कुस्ती क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. अनंत बदर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं.
कुस्तीचा वाद शमणार की पेटता राहणार : दरम्यान काही वर्षांपूर्वी कुस्तीगीर परिषदेमध्ये मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दुसऱ्या कुस्तीगीर संघटनेची स्थापना झाली होती. परंतु आता कुस्तीगीर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर संपूर्ण कार्यकारणी बदलली आहे. त्यामुळं या दोन संघटनेच्या वादावर पडदा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित पवार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्वांनी एकत्रित येऊन कुस्तीगिरांना न्याय द्यावा अशी भूमिका काही जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचं देखील समोर आलंय.
कुस्तीला पुन्हा सोन्याचे दिवस आणणार – रोहित पवार : यावेळी उपस्थितांचे आभार मानताना रोहित पवार म्हणाले की, “कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील मैदानी खेळ असून या कुस्तीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि राज्यातील गुणी व होतकरु पैलवानांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शरद पवारांनी या संघटनेत केलेलं काम माझ्यापुढं दीपस्तंभाप्रमाणे असून यापुढंही आम्हाला सर्वांनाच त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.” तसंच यावेळी निवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघांचे रोहित पवार यांनी आभार मानले.

