महाराष्ट्र

आंबेडकर-हेडगेवार विचारांचा समन्वय – बंधुत्वाच्या सूत्राने बांधलेला अंजनगावचा वैचारिक मंच

-सचिन इंगळे प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी : समाजातील दरी बुजवून माणसामाणसात संवाद, समता आणि परस्पर सन्मानाची नाळ अधिक घट्ट करणारी बंधुता परिषद अंजनगाव सुर्जी येथील वेद मंगल कार्यालय, गुलजारपुरा येथे प्रेरणादायी वातावरणात पार पडली. २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील भवानी शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृतिदिनानिमित्त २ जानेवारी बंधुता परिषद समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत जात, धर्म, पंथ किंवा वर्णाच्या चौकटींपलीकडे जाऊन माणुसकीच्या आधारावर समाज घडविण्याचा संदेश ठळकपणे मांडण्यात आला. वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र राष्ट्रहिताच्या व्यापक उद्दिष्टांसाठी बंधुत्व, सहअस्तित्व आणि संवादाची भूमिका स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाच्या आचार-विचारातून बंधुतेची भावना प्रकट झाली, तर सामाजिक सलोखा अधिक दृढ होऊन राष्ट्रनिर्मितीला नवे बळ मिळेल, असा सूर परिषदेत उमटला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना, ते केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेचे जागते प्रतीक असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. वंचित, शोषित व दुर्बल घटकांसाठी त्यांनी उभारलेला संघर्ष हा आधुनिक भारताच्या मूल्यांचा पाया असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र ही समता कायद्याच्या पुस्तकातच मर्यादित न राहता समाजमनात खोलवर रुजली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
याचवेळी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांवर प्रकाश टाकताना, १९२५ मध्ये नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून त्यांनी समाजात शिस्त, राष्ट्रसेवा आणि देशभक्तीचे संस्कार रुजवले, असे सांगण्यात आले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या संघटनात्मक कार्यामुळे लाखो युवक राष्ट्रकार्यासाठी प्रेरित झाले असून आजही त्यांचे विचार समाजघडणीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत मांडण्यात आले.
या परिषदेला सुनील मेश्राम, सतीश वानखडे, प्रफुल गवई, प्रफुल कात्रे, अंकुश जावरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रणय रावळे यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने संपूर्ण वातावरण देशप्रेमाने भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल कात्रे यांनी केले, सूत्रसंचालन अंकुश जावरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन माहोरे यांनी केले. राष्ट्रगीताने या प्रेरणादायी बंधुता परिषदेची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.