महाराष्ट्र सुन्न! जन्माच्या अवघ्या 8 तासानंतर लेकीने दिला लष्करात सेवा बजावणाऱ्या बापाला अंतिम निरोप

संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला अक्षरशः पिटाळून टाकणारी एक घटना साताऱ्यात घडली आहे. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या पत्नीने कन्यारत्नाला जन्म दिला. पतीच्या निधनानंतर केवळ आठ तासांनी जन्मलेल्या चिमुकलीला आपल्या पित्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी यावे लागले. याशिवाय पत्नीही स्ट्रेचरवर अंतिम दर्शन घेण्यासाठी आली होती. या लेकीचा आणि स्ट्रेचरवर असलेल्या पत्नीने पती-पित्याचे अंतिम दर्शन घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, तो पाहून कुणाचेही अश्रू आवरणार नाहीत.
अपघातात दुर्दैवी अंत
भारतीय सैन्यात सेवा देणारे जवान प्रमोद जाधव यांचा सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसांची रजा घेऊन ते गावी आले होते. घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू होती, आनंदाचे क्षण येणार होते; मात्र नियतीने घात केला. कुटुंबावर काळाने वाईट घाला घातला . एका अपघाताने कुटुंबाचा आधार हरपला आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेनंतर काही तासांतच प्रमोद जाधव यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. एकीकडे नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद आणि दुसरीकडे पतीच्या निधनाचं असह्य दुःख या दोन टोकाच्या भावना एकाच वेळी सहन कराव्या लागल्या. त्यानंतर प्रमोद जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ परळी येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यदर्शनाचा प्रसंग सर्वांनाच हादरवून गेला
या अंत्यदर्शनाचा प्रसंग सर्वांनाच हादरवून गेला. रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून पत्नी आणि अवघ्या आठ तासांची चिमुकली लेक अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. पित्याच्या पार्थिवावर फुलं अर्पण करताना आईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि त्या निरागस बाळाची शांत झोप हा क्षण उपस्थित प्रत्येकाचं काळीज पिळवटून गेला. आईसह आठ तासांच्या लेकीने स्ट्रेचरवरून घेतलेले अंतिम दर्शन पाहून संपूर्ण गाव भावूक झालं.
नागरिकही भावुक
या हृदयद्रावक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करत आहे. “देशसेवेसाठी झटणाऱ्या जवानांच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गावकरी, स्थानिक प्रशासन आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देत होते.
वीर जवान प्रमोद जाधव यांनी देशसेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांच्या कन्येच्या रूपाने वीर जवान प्रमोद जाधव यांची आठवण कायम जिवंत राहणार आहे.

