महाराष्ट्र

नायडू प्लॉटमधील नागरिकांचे जगणे कठीण : मूलभूत सुविधांच्या अभावामुळे संताप उफाळला

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहरातील नायडू प्लॉट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पक्के रस्ते व नाली बांधकामाचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला असून, मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन मोठ्या अडचणीत सापडले आहे. परिसरात सिमेंट काँक्रीट रस्ते नसल्याने घरांमधील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून, त्यामुळे दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढत चालला आहे.
नायडू प्लॉटमधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना रोजच धोक्याचा सामना करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना गंभीर अडचणी येत असून, सायकल घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. वयोवृद्ध नागरिकांसाठी तर या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे.
पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचत असल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प होते. अनेकदा वाहन रस्त्यात अडकून पडतात. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने परिसरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे.
या समस्यांबाबत रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षांत नगर परिषदेकडे वेळोवेळी निवेदने व अर्ज सादर केले असल्याचे सांगितले. मात्र, तब्बल पंधरा वर्षांपासून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
नायडू प्लॉटमधील रहिवाशांनी ठाम मागणी केली आहे की, श्री. चंद्रकला विश्वनाथ आवंडकर यांच्या घरापासून ते श्री. सुखदेवराव अरबाड यांच्या घरापर्यंत तसेच श्री. गोपाल महादेवराव येऊल यांच्या घरापासून ते श्री. विक्रम धुळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम तातडीने करण्यात यावे.
या मागणीसाठी मनमोहन बोकडे, प्रदीप आवंडकर, आनंद आवंडकर, सुखदेव माकोडे, रविंद्र धुळे, वासुदेव माकोडे, प्रल्हाद आवंडकर, सुखदेव अरबाड यांच्यासह अनेक नागरिकांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या काळातही नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत हक्कांशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे नगर परिषदेने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा नायडू प्लॉट परिसरात तीव्र जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.