ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

श्रावणी सोमवारनिमित्त साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी; भाविकानं दान केल्या चांदीच्या वस्तू

श्रावणी सोमवारनिमित्त शिर्डीत भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तसंच एका साईभक्तानं साईंना चांदीच्या वस्तू दान केल्या आहेत.

शिर्डी : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यानं देशभरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरातही भक्तांची साई दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे. सोमवारनिमित्त साईबाबांच्या समाधीवर बेलपत्र ठेवण्यात आलंय. तसंच साईंच्या मूर्तीला सुवर्ण अलंकारही चढवण्यात आले आहेत. श्रावण सोमवारनिमित्तानं राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलीय.

साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी : पहिल्या श्रावणी सोमवारी शिर्डीसह परिसरातील भाविकांनी कोपरगाव येथील गोदावरी नदीतून कावडीनं आणलेल्या पाण्यानं साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्नान घातलं. प्रत्येक सणाला त्या त्या देवतांच्या प्रतिमा साई समाधीवर ठेवत त्याचं पूजन केलं जातं. श्रावणी सोमवार असल्यानं देवाधी देव महादेवाची प्रतिमा साई समाधीजवळ ठेवत विधीवत त्याचं पूजन करण्यात आलं. ‘सबका मालिक एक’चा महामंत्र देणाऱ्या साईबाबांनी आपल्या जीवन काळात भक्तांना अनेक रुपात दर्शन दिलं असून, आज साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानं साक्षात महादेवाचं दर्शन घडल्याचं समाधान भाविकांना आहे.

 

चांदीच्या वस्तू केल्या दान : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हैदराबाद येथील टी. व्ही. एस. माधवराव या साईभक्त परिवारानं शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 104 ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या चौरी आणि एका शंखाचं कव्हर अर्पण केलंय. टी. व्ही. एस. माधवराव या साईभक्त परिवाराची गेल्या अनेक दिवसांपासून साईबाबांना चांदीची वस्तू दान करण्याची इच्छा होती. आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती पूर्ण झाली.

 

देणगीदाराचा केला सत्कार : या चांदीच्या चौरी आणि शंखाचं कव्हर काही काळ साईबाबांच्या चरणांवर ठेवून माधवराव परिवारानं साई समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर या चांदीच्या वस्तू साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडं सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी साई संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त माधवराव यांचा मूर्ती आणि शाल देऊन सत्कार केला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.