सीताबाई संगई प्राथमिक शाळेत ‘हर्षोल्हास २०२६’ची रंगत; विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जल्लोष

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी, अंजनगाव सुर्जी यांच्या वतीने संचालित सीताबाई संगई प्राथमिक शाळा (सेमी इंग्लिश) येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत ‘हर्षोल्हास २०२६’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम पालक, शिक्षक आणि शहरातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता बालासाहेब संगई स्मृती सभागृहात कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सी.सी. एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विवेक संगई होते, तर उद्घाटक म्हणून अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा प्रियंका मालठाणे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती क्षेत्र संयोजक नितीन टाक आणि पालक प्रतिनिधी रेखाताई टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शिक्षणाबरोबरच कला, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शालेय जीवनात स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वृद्धीसाठी मोलाचे ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘हर्षोल्हास २०२६’ अंतर्गत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कार, नाटिका, गीत, समूहगायन, देशभक्तीपर कार्यक्रम तसेच लोककलेच्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. रंगतदार सादरीकरणामुळे सभागृहात उत्साहाची लाट उसळली होती. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्तबद्ध सादरीकरण आणि कलात्मक कौशल्य पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
स्नेहसंमेलनाचा समारोप दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्याने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.सी. एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य विजया संगई उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अंजनगाव सुर्जी पोलीस उपनिरीक्षक प्रशाली पाथरकर, प्रा. डॉ. ममता येवतकर आणि पत्रकार मनोज मेळे यांची विशेष उपस्थिती लाभली. शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक अनिल जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पडोळे मॅडम यांनी समर्थपणे सांभाळत नियोजन व अंमलबजावणी यशस्वी केली.
एकूणच सीताबाई संगई प्राथमिक शाळेचा ‘हर्षोल्हास २०२६’ हा उपक्रम शैक्षणिक आणि सांस्कृतिक समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

