मेळघाटातील रायपूर गावाची दुहेरी कोंडी; व्याघ्र प्रकल्पामुळे वीज येईना, ढगाळ वातावरणात सौर उर्जा ठरतेय कुचकामी
एकीकडं व्याघ्र प्रकल्पात गाव येत असल्यानं वीज येत नाही. तर दुसरीकडं सौर उर्जेला मर्यादा येत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले. खरा संवादचा स्पेशल रिपोर्ट.

अमरावती – सातपुड्याच्या कुशीत घनदाट जंगलांनी वेढलेल्या चिखलदरा तालुक्यातील रायपूर या अतिदुर्गम आणि निसर्गरम्य गावात आजही विकासाचा प्रकाश पोहोचलेला नाही. सुमारे तेराशे लोकसंख्या असलेल्या या गावात विजेचा कायमस्वरूपी पुरवठा नाही. सात-आठ वर्षांपूर्वी बसवलेली सौर ऊर्जा पावसाळ्यात निष्प्रभ ठरते. आभाळ दाटलं की वीज जाते. वीज गेली की पाणीपुरवठा थांबतो, अशी भीषण परिस्थिती ग्रामस्थांवर ओढावली आहे. या गावात घरटी टुमदार होत आहेत. परिसरातील जंगलासह ग्रामस्थांची शेतीदेखील हिरवीगार आहे. मात्र, वीज नसल्यानं शेतीवर कधीही संकट कोसळू शकतं. वीज नसल्यानं गाव विकासापासूनदेखील लांबच आहे.
असा आहे या गावचं वास्तविक चित्र – अमरावती ते धारणी मार्गावर अमरावतीपासून 110 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सेमाडोह या गावापासून उंच पहाडावर सुमारे 14 किलोमीटर अंतरावर रायपूर हे गाव घनदाट जंगलात वसलं आहे. या गावात बाहेरील व्यक्तींना जाण्याकरिता वनविभागाच्या कुवापाटी चेक पोस्टवर परवानगी घ्यावी लागते. नोंदणी केल्यावर आणि परवानगी मिळाल्यावरच समोर गावाच्या दिशेनं जातं येतं. गावाच्या वेशीवर असणाऱ्या ग्रामस्थांच्या शेतात सर्वत्र सोलर प्लेट लावलेल्या दिसतात. गावात पोहोचताच सुरुवातीला वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वसाहत असून तिथून समोर एक किलोमीटर अंतरावर रायपूर हे आदिवासी समुदायाचं गाव वसलं आहे. या गावात प्रत्येक घराच्या छपरावर सोलर प्लेट लागलेली दिसते. गावात वीज नसल्याने सौर ऊर्जा हेच प्रकाश व्यवस्थेचा एकमेव पर्याय आहे. घरात दोन दिवे आणि टीव्ही या सौर ऊर्जेमुळे सुरू होतो. गावातील तीन-चार छोट्या चौकाच्या ठिकाणी सौरऊर्जेवरच खांबांवरचे दिवेदेखील लागतात. गावात पाण्याची टाकी आहे. या टाकीमध्ये गावापासून खाली दीड दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका विहिरीतून पाण्याचा पुरवठा होतो. हे पाणीदेखील सौर ऊर्जेद्वारेच टाकीत पोहोचतं.
पाणी नसल्यानं काम ठप्प – “पिण्यासाठी शुद्ध आणि ताजं पाणी लागतं. आता दोन दिवसांपासून सौरऊर्जा काही काम करत नाही. त्यामुळे आमच्या गावातील नळांना पाणी आलं नाही. दुर्दैवानं आम्हाला शिळं पाणी प्यावं लागतं. गावाच्या खाली लांब विहीर आहे. मात्र, लहान मुलांना घरी एकटा सोडून विहिरीवर पाणी भरायला जाण्याची हिंमत होत नाही. आमच्या नशिबी खरंच खूप त्रास आहे”, असं रायपूर येथील रहिवासी सुमार्ती धिकार यांनी सांगितलं.
1982 पासून स्वप्न अधांतरी – “आम्ही पिढ्यानपिढ्या या जंगलात राहतो आहे. 1982 मध्ये आमच्या गावासह बारात आणि दर्या खोऱ्यात असणाऱ्या अतिदुर्गम भागातील एकूण 40 गावात वीज येणार होती. चिखलदरा येथून सेमाडोहपर्यंत वीज पुढे जारीदापर्यंत वीज जोडणी झाली. आमच्या गावात विजेचे खांब आणून टाकण्यात आलेत. मात्र अचानक टायगर प्रोजेक्टने आमचा हा भाग कोअर एरिया म्हणून घोषित केला. त्यानंतर वीज जोडणीचे काम थांबलं. हे नुसतं कामच थांबलं नाही तर आमच्या गावात वीज येईल, हे स्वप्नदेखील रखडलं”, असं सानू भुऱ्या धांडे यांनी सांगितलं.
अंडरग्राउंड वीज जोडणीचा पर्याय – “वीज जोडणीसाठी जंगलातील झाडांना त्रास होतो. काही ठिकाणी झाड कापावी लागतील, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र, गावात ज्याप्रमाणे बीएसएनएलची सेवा ही अंडरग्राउंड पोहोचली, अगदी तसंच वीज पुरवठादेखील गावात अंडरग्राउंड येऊ शकतो. शासनानं योग्य भूमिका आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आमचा विचार केला तर जंगलही वाचेल. गावात 24 तास वीज आणि पाणी मिळेल”, असंदेखील सानू भुऱ्या धांडे यांनी सांगितलं.
विकास खुंटल्याची खंत – “व्याघ्र प्रकल्पामुळं अपेक्षित असा विकास झालेला नाही”, अशी खंत सानू भुऱ्या धांडे यांनी व्यक्त केली. पूर्वी वनविभागाच्या काळात स्थानिकांच्या सहभागातून जंगल संवर्धन व्हायचे. आमच्या भागात बांबू कटाई व्हायची, त्यातून चांगलं उत्पन्न मिळायचं. निश्चित धोरण आखून जंगलातील सागवान कापून ते वनविभागाच्या डेपोमध्ये जायचं. त्या काळात जंगल हे हिरवंगार होतं. आता, मात्र सागवानाची झाड आपोआप कोसळत आहेत. जंगलाचं पूर्वीसारखं सौंदर्य उरलेलं नाही. पूर्वीसारखे भरमसाठ प्राणीदेखील जंगलात नाही. आमच्या ग्रामस्थांचा शेती हा मुख्य आधार आहे. शेती ही पूर्णतः विजेवर अवलंबून आहे. मात्र, गावात वीजच नाही. यामुळे गावात समृद्धी नाही”, अशी समस्या सानू भुऱ्या धांडे यांनी सांगितली.
“मेळघाटातील अतिदुर्ग गावांमध्ये वीज जरी पोचली नाही तरी त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून सौरऊर्जेची व्यवस्था केली आहे. त्या भागात शहरासारख्या विजेची गरज नाही. ग्रामीण भागात हवी तशी व्यवस्था मेळघाटातील रायपूरसह अन्य गावांमध्ये आहे. मेळघाटात सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी वीज वितरण कंपनी प्रयत्न करत आहे. सौर ऊर्जा त्या भागात समाधानकारक सेवा देण्यास अतिशय योग्य पर्याय आहे”, असं वीज वितरण कंपनीच्या एका जबाबदार अधिकाऱ्यांनी खरा संवादशी बोलताना स्पष्ट केलं.
कशी आहे गावातील परिस्थिती
- गावात इंग्रजांनी 1892 मध्ये उभारलेल्या विश्रामगृहातदेखील सौरऊर्जेचीच व्यवस्था आहे.
- व्याघ्र प्रकल्प अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतदेखील सौर ऊर्जाच आहे.
- प्रत्येक घरावर सोलर प्लेट
- गावातील पथदिवेदेखील सौरऊर्जेवरच सुरू होतात.
- 1982 मध्ये वीज पुरवठ्यासाठी आलेले खांब गावात आजही पडून आहेत.
- गावालगत प्रत्येक शेतात सौर ऊर्जा यंत्रणा लागलेली दिसते.
- गावात ई सेवा केंद्र आहे. दोन मिनिटांच्या कामासाठी तासभराहून अधिक वेळ लागतो.

