ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

मेळघाटमध्ये होळी सणावर आर्थिक संकट, मजुरीचे पैसे न मिळाल्याने आदिवासी बांधव अडचणीत

मेळघाटात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा हा सण साजरा करण्यावर सावट आहे.

अमरावती – सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला मेळघाट सध्या पाणगळीतून जात असला तरी पळसाच्या लाल भडक फुलांनी संपूर्ण जंगल रंगून गेलं आहे. निसर्गात रंगांची उधळण सुरू असतानाच मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण होळी उत्साहात साजरा होण्याची तयारी सुरू आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेले अनेक जण होळीच्या निमित्तानं पुन्हा गावाकडं परत येत आहेत. मात्र, रोजगार हमी योजनेतील थकीत मजुरीमुळे आनंदातही आर्थिक चिंतेची छाया दिसून येते.

 

मेळघाटात होळीचे पाच दिवस – मेळघाटात होळी सुमारे पाच दिवस साजरी केली जाते. प्रत्येक दिवसाला वेगळी परंपरा आणि रंग असतो. पहिल्या दिवशी होळी प्रज्वलित केली जाते. अनेक गावांमध्ये सायंकाळी सहा वाजता होळी पेटते, तर माखलासारख्या उंच पहाडावर दुर्गम ठिकाणी असणाऱ्या गावांमध्ये मध्यरात्री होळी पेटवण्याची परंपरा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. रंगांची ही उधळण सलग चार दिवस चालते. होळीच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी अनेक भागात मेघनाथ पूजन आणि त्या निमित्ताने मोठी यात्रा भरते. या यात्रेत आदिवासी बांधव मोठ्या उत्साहानंं सहभागी होतात.

फगवा मागण्याची खास परंपरा – मेळघाटातील होळीची एक अनोखी परंपरा म्हणजे फगवा मागणे. मेळघाट बाहेरून येणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडून पाच रुपये, दहा रुपये असं ते जे देतील तितके पैसे घेतले जातात. यावेळी आदिवासी तरुण-तरुणी वाहनांसमोर दोर बांधून ठेवतात. विशेष म्हणजे, वाहनांसमोर ही आदिवासी पुरुष आणि महिला पारंपरिक नृत्य आणि गीत गाऊन बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचं मनोरंजन देखील करतात. वाहन चालकांनी पैसे दिल्यानंतर रस्ता खुला केला जातो. अनेक पर्यटक तर खास मेळघाटातील आदिवासींची होळी आणि हा फगवा अनुभवण्यासाठी होळीच्या पर्वावर मेळघाटात येतात.

 

मेघनाथ पूजेला विशेष महत्त्व – होळीनंतर चौथ्या, पाचव्या दिवशी अनेक गावांमध्ये मेघनाथाची पूजा केली जाते. मेघनाथ पूजेनिमित्त मोठ्या यात्रा भरतात. पारंपरिक विधी आणि कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा मेघनाथ पूजेच्या निमित्तानं आहे.

 

मजुरी अभावी सणावर सावट – मेळघाटातील अनेक आदिवासी मजूर रोजगार हमी योजनेत काम करत असले तरी दिवाळीपासून मजुरी थकीत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शासनाने वेळेवर पैसे दिले तर गरीब आदिवासी कुटुंब आपल्या मुलांना नवीन कपडे घेतील आणि होळीचा आनंद देखील साजरा करतील, असं काही आदिवासी बांधवांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं. “गरीब लोक जसे पैसे तसा सण साजरा करतात. कामावर गेले तरच पैसे येतात. जे लोक मेळघाटबाहेर कामाला गेलेत त्यांना कंत्राटदारांनी योग्यवेळी पैसे दिले तर ते होळीपर्यंत गावात परत येतात. कशीही परिस्थिती असली तरी होळीचा आनंद आम्ही सोडत नाही,” असं धामणी गावातील रहिवासी असणाऱ्या कांता जामूनकर म्हणाल्या.

कामाचा मोबदला मिळाला नसल्याची खंत – “दिवाळीपासून रोजगार हमी योजनेच्या कामावर असणाऱ्या आदिवासी मजुरांना पैसे मिळालेले नाहीत. आता आमचा होळी हा सर्वात मोठा सण गरीब लोकं कसा साजरा करणार?” असा सवाल रायपूर येथील रहिवासी सानू भुऱ्या धांडे यांनी ‘ईटीव्ही भारत’ शी बोलताना उपस्थित केला. “पगार मिळाला तर लोकांची होळी रंगेल नाहीतर गरिबीशी दोन हात करत सण साजरा करावा लागेल,” अशी चिंता रायपूर येथील रहिवासी वामन यांनी व्यक्त केली.

निसर्गाच्या रंगात उत्सवाचा रंग –

सध्या मेळघाटात पानगळ सुरू असली तरी पळसाच्या लाल फुलांनी डोंगरदऱ्या उजळून निघाल्या आहेत.

जंगलात लाल केशरी रंगाची उधळण वाऱ्यावर डोलणाऱ्या पळस फुलांचा साज नजरेत भरणार आहे.

लगीनसराईची लगबग – आदिवासी बांधवांचा होळी हा सर्वात मोठा सण साजरा होताच लहानाची लगबग सुरू होते. होळीच्या निमित्ताने रोजगारातून आणि शेतमाल विकून आलेला पैसा घरी राहत असतानाच अनेक कुटुंबात तरुण-तरुणींचं लग्न रंगोत्सवानंतर लावलं जातं. “होळीनंतर लग्नाची धामधूम उरकताच आठ दिवसांनी पुन्हा सर्वजण रोजगाराच्या शोधात मेळघाट बाहेर पडतात,” असं धामणी गावातील रहिवासी असणाऱ्या कांता जमुनकर यांनी सांगितलं.

 

32 कोटी आलेत, होळी आनंदतच होईल – ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने’अंतर्गत अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांसाठी 32 कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत. मेळघाटातील आदिवासी बांधवांना होळीपूर्वीच त्यांच्या कामाचे पैसे मिळतील आणि होळी आनंदात साजरी होईल,” असं उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी खरा संवादशी  बोलताना स्पष्ट केलं.

 

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.