लांडगा आणि रानकुत्र्यांचा मैत्रीपूर्ण सहवास; मेळघाटात निसर्गाचा अनोखा चमत्कार
मेळघाटात दोन वेगळ्या प्रजातींचा एकत्र संचार पाहायला मिळाला. आता हा संचार संशोधनाचा विषय ठरला आहे. वाचा स्पेशल रिपोर्ट...

अमरावती – जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरात वन्यजीव अभ्यासकांना आश्चर्यचकित करणारी एक दुर्मिळ घटना निदर्शनास झाली. भारतीय राखाडी लांडगा आणि आशियाई रानकुत्रे या दोन वेगळ्या प्रजाती एकत्रितपणे शांत सहवास करताना दिसल्या. विशेष म्हणजे, या गटाचं नेतृत्व एका प्रौढ मादा लांडग्याकडं असल्याचं निरीक्षणात स्पष्ट आलंय. ही नोंद मेळघाटच्या बफर क्षेत्रात वन्यजीव अभ्यासक आणि अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख यांनी केली. सुमारे 40 मिनिटं हा गट कोणतीही आक्रमकता न दाखवता एकत्र फिरताना दिसला आहे.
परंपरेला छेद देणारं वर्तन – वन्यजीव तज्ञांच्या मते, लांडगे आणि रानकुत्रे या दोन्ही ‘कॅनीड’ कुटुंबातील प्रजाती असल्या तरी त्यांच्या अधिवासात आणि सामाजिक रचनेत भिन्नता आढळते. “भारतीय राखाडी लांडगा हा मोकळे रानमाळ, गवताळ कूरण आणि कृषी परिसरात आढळतात, तर रानकुत्रे हे दाट पानझडी आणि सदाहरित जंगलांमध्ये दिसतात. या प्रजाती सहसा परस्पर सहवास टाळतात. अशा प्रकारची आंतर प्रजाती मैत्री मेळघाटात पहिल्यांदाच आढळली,” असं प्रा. डॉ. सावन देशमुख खरा संवादशी बोलताना म्हणाले.
नेतृत्वाची अनोखी कहाणी – या निरीक्षणातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, मादी लांडगा ही रानकुत्र्यांच्या गटाचं नेतृत्व करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. सामान्यतः लांडग्यांच्या कळपात प्रमुख नर नेतृत्व करतो, तर रानकुत्र्यांच्या गटात मादी नेतृत्व करते. मात्र, या ठिकाणी चित्र पूर्णतः उलट दिसत आहे.
अधिक अभ्यासाची गरज – “मादी लांडगा नेतृत्व करत असणारा रानकुत्र्यांचा हा नवा गट तयार झाला असावा किंवा चार रानकुत्र्यांचा कळप वेगळा पडला असावा. त्या गटाला दिशा देण्यासाठी मादी लांडग्याची साथ लाभली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यामागील नेमकं कारण समजण्यासाठी अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे,” असं प्रा .डॉ. सावन देशमुख म्हणाले.
संशोधनासाठी नवी दिशा – मेळघाटातील ही घटना केवळ कुतूहलाची बाब नसून, आंतरप्रजाती वर्तन अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संबंधित निरीक्षणांची वैज्ञानिक पद्धतीनं चिकित्सा सुरू असून, लवकरच यावर संशोधन निबंध प्रसिद्ध होण्याची शक्यता प्रा. डॉ. सावन देशमुख यांनी वर्तवली.

