दहावी परीक्षा घोटाळ्याचा स्फोट! शिक्षण यंत्रणाच संशयाच्या कटघऱ्यात; गटशिक्षणाधिकारी अटकेत, अंजनगाव सुर्जी संतापाने पेटले

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी : दहावीच्या अत्यंत संवेदनशील परीक्षेत कथित गैरप्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात संतापाचा स्फोट झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या प्रक्रियेतच संशयास्पद हालचाली झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर पोलिसांनी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला अटक केली असून शिक्षण यंत्रणेवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा संतप्त सवाल पालक-नागरिक विचारत आहेत.
घटना येथील सिताबाई संगई विद्यालय या परीक्षा केंद्रावर घडल्याचे सांगितले जाते. २७ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना सर्व काही नियमाप्रमाणे चालल्याचे भासवले जात होते. मात्र पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका मोजताना दोन उत्तरपत्रिका कमी असल्याचे आढळताच परीक्षा केंद्रात एकच खळबळ उडाली. तपासादरम्यान एका कर्मचाऱ्याजवळ त्या उत्तरपत्रिका सापडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून हा प्रकार केवळ दुर्लक्ष नसून नियोजित कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून नाकारलेली नाही.
या घटनेची तक्रार जिल्हा परिषद माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रजनी नारायण शिरभाते यांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सुधीर खोडे याच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी सुशील कुमार अभ्यंकर, अनिल हाडोळे आणि दोन अज्ञात विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार विद्यार्थ्यांचा शोध सुरू असून तपास यंत्रणा अधिक खोलात जात असल्याची माहिती मिळते.
कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. परीक्षा प्रक्रियेत वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने शिक्षण विभागातील जबाबदारीची साखळीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “जर परीक्षा व्यवस्थेचे रक्षण करणारेच संशयाच्या भोवऱ्यात असतील, तर विद्यार्थ्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी?” असा संतप्त सवाल समाजमाध्यमांतून आणि नागरिकांतून उपस्थित होत आहे.
दहावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा मानली जाते. अशा वेळी उत्तरपत्रिकांबाबत संशय निर्माण होणे म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर गदा येण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा शिक्षण व्यवस्थेवरील उरलेसुरले विश्वासाचे धागेही तुटतील, असा इशारा पालकांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिस तपास वेगाने सुरू असून आरोपींची चौकशी, पुरावे संकलन आणि संभाव्य संगनमताच्या धाग्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे केवळ एका केंद्राचा नव्हे तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनावर कठोर आणि निर्भीड कारवाईचा दबाव प्रचंड वाढला आहे.

