शिवसेनेनं आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमले संपर्कप्रमुख; श्रीकांत शिंदेंना संपूर्ण मुंबईची जबाबदारी, तर राज्यातील धुरा कोणाकडे?
शिवसेनेनं राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची देखील घोषणा केली आहे. यात भरत गोगावले, प्रकाश आबिटकर आणि संजय राठोड या तीन मंत्र्यांचा समावेश आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आतापासूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कंबर कसली असून लोकसभा निहाय संपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना पक्षातर्फे देण्यात आली आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर भिवंडी व कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची देखील घोषणा : तर दुसरीकडे शिवसेनेनं राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची देखील घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर आहे. तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे. दक्षिण कोकण विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुखपदी मंत्री प्रकाश आबिटकर : मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुखपदी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता विभागीय संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दिपक सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हांकरिता विभागीय संपर्कप्रमुख पदी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख तर पराग पिंगळे यांची विभागीय सह संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे आहे.
या नियुक्त्यांचा आगामी निवडणुकीत फायदा होणार का? : शिवसेनेकडून राज्यातील सर्वच मतदारसंघासाठी संपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकी लक्षात घेता या नियुक्त्या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला महाराष्ट्रात हवं तसं यश मिळालं नव्हतं. त्यात मुंबईत शिवसेनेचा केवळ एकच खासदार निवडून आला होता. यामुळं झालेल्या नियुक्त्या महत्त्वाच्या असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी काळात शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होतो का? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.
लोकसभा निहाय संपर्कप्रमुखांची नावं…
1) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
2) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
3) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के
4) नंदुरबार – माजी आमदार शिरीष चौधरी
5) धुळे व दिंडोरी – शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी
6) जळगाव – आमदार दिलीप लांडे
7) रावेर – आमदार तुकाराम काते
8) बुलढाणा – संजय सोनार
9) अकोला – माजी आमदार राजन साळवी
10) अमरावती – आमदार किशोर अप्पा पाटील
11) वर्धा – आमदार डॉ. मनीषा कायंदे
12) रामटेक – अनिल कोकीळ
13) नागपूर – माजी खासदार संजय निरुपम
14) भंडारा-गोंदिया – विलास चावरी
15) गडचिरोली- चिमूर – माजी मंत्री जगदीश गुप्ता
16) चंद्रपूर – आमदार कृपाल तुमाने
17) यवतमाळ – वाशिम – शिवसेना उपनेत्या प्रिती बंड
18) हिंगोली – शिवसेना उपनेते आनंदराव जाधव
19) नांदेड – दत्ता दळवी
20) परभणी – भास्कर आंबेकर
21) जालना – खासदार संदिपान भुमरे
22) छत्रपती संभाजी नगर – विलास पारकर
23) नाशिक – आमदार सुहास कांदे
24) पालघर – पांडुरंग पाटील
25) रायगड – अनिल नवघरे
26) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा – मंत्री उदय सामंत
27) बारामती – किरण लांडगे
28) शिरुर – आमदार शरद सोनवणे
29) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे
30) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे
31) बीड – मनोज शिंदे
32) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील
33) लातूर – मंगेश कुडाळकर
34) सोलापूर – खासदार धैर्यशील माने
35) माढा – चंद्रहार पाटील
36) सांगली – योगेश जानकर
37) सातारा – शरद कणसे
38) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक
39) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर
40) हातकणंगले – आमदार सुहास बाबर

