महाराष्ट्र

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती

-जिल्हा प्रतिनिधी अमरावती : प्रशासनातील पारदर्शकता, गतिमान सेवा वितरण आणि नागरिकांच्या हक्कांच्या अंमलबजावणीला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण किशोर डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ३० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती घोषित करण्यात आली.

नवीन प्रशासन भवन, मुंबई येथे आयोजित शपथविधी समारंभात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने अरुण डोंगरे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली.

दीर्घ प्रशासकीय अनुभव आणि लोकाभिमुख कार्यशैलीसाठी ओळख असलेल्या अरुण डोंगरे यांच्या नियुक्तीकडे प्रशासनातील महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणून पाहिले जात आहे. राज्य सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना अरुण डोंगरे यांनी राज्य शासनाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

या शपथविधी सोहळ्यास विधानसभा सदस्य करण देवतळे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.