विकासकामांना गती, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य; महापौर श्रीचंद तेजवानी यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील विकासकामांना अधिक वेग देत नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केले. महानगरपालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनातील कार्यक्षमतेवर भर दिला.
यावेळी महापौरांनी विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखत विकासकामांची अंमलबजावणी गतीमान करण्याचे निर्देश दिले. तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राहिल्यास नागरिकांच्या समस्या अधिक परिणामकारकपणे सोडविता येतील, असे त्यांनी नमूद केले.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल तातडीने घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करावे, प्रलंबित विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत आणि प्रत्येक कामात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने उत्तरदायित्वाची भावना ठेवून काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक यांच्यासह महानगरपालिकेतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून आगामी कालावधीत कामकाज अधिक गतिमान करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

