लाखो रुपयांची बाजारपेठ तीन वर्षांपासून कुलूपबंद; महात्मा फुले मार्केटमधील ओट्यांच्या लोकार्पणाचा मुहूर्त कधी?

-अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) : अंजनगाव सुर्जी शहरातील सुर्जी बुधवारा परिसरात नगर परिषदेमार्फत सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले मार्केटच्या सुसज्ज ओट्यांचे काम पूर्ण होऊन तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला असतानाही या बाजारपेठेचे लोकार्पण आणि ओट्यांचे वाटप अद्यापही रखडलेले आहे. परिणामी लाखो रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वापराअभावी बंद अवस्थेत पडून असून, नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना नियोजित आणि आधुनिक व्यवसायिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायाला पर्याय निर्माण व्हावा तसेच शहराला सुसंघटित बाजारपेठ मिळावी या उद्देशाने नगर परिषदेकडून महात्मा फुले मार्केटची उभारणी करण्यात आली होती. बाजारपेठेतील ओटे, पायाभूत सुविधा आणि आवश्यक बांधकामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा नागरिक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात उद्घाटन, लिलाव प्रक्रिया आणि ओट्यांचे वाटप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संपूर्ण प्रकल्प धूळ खात पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आजही मार्केटमधील अनेक ओटे रिकामे असून संपूर्ण परिसर सुनसान अवस्थेत दिसून येतो. सार्वजनिक निधीतून उभारलेली ही मालमत्ता वापराअभावी निष्क्रिय ठरत असून त्याची झीजही होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी अस्वच्छता वाढत असल्याचे चित्र असून, रिकाम्या जागांचा गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वेळेवर निर्णय न घेतल्यास लाखो रुपयांच्या या प्रकल्पाचा मूळ उद्देशच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या विषयावर महत्त्वाची मागणी पुढे केली आहे. त्यांच्या मते, महात्मा फुले मार्केट परिसरात उपलब्ध असलेल्या जागेचा योग्य उपयोग करून अतिरिक्त सुसज्ज ओट्यांची उभारणी करण्यात यावी. त्यानंतर विद्यमान तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या ओट्यांचे पारदर्शक आणि नियमानुसार वाटप करून पात्र व्यावसायिकांना व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. त्यामुळे अधिकाधिक व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल आणि शहरातील व्यवसायिक व्यवस्थेलाही नवे स्वरूप प्राप्त होईल.
विशेषतः शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यालगत व्यवसाय करणारे मटण, चिकन आणि मासळी विक्रेते यांच्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व नियोजित व्यवस्था निर्माण करण्यात आल्यास शहरातील अतिक्रमणाच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येईल, असे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिकांनाही एका ठिकाणी आवश्यक वस्तू उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण होईल.
शहरातील नागरिकांचा आता एकच प्रश्न आहे की, सार्वजनिक निधीतून उभारलेल्या आणि पूर्णत्वास गेलेल्या या बाजारपेठेच्या उद्घाटनासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? विकासकामांवर खर्च होणारा निधी प्रत्यक्षात नागरिकांच्या उपयोगात आला तरच त्याचे महत्त्व अधोरेखित होते. अन्यथा कोट्यवधींच्या विकास आराखड्यांप्रमाणेच ही बाजारपेठही केवळ कागदोपत्री यशस्वी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महात्मा फुले मार्केटचे तातडीने लोकार्पण करून ओट्यांचे वाटप प्रक्रिया सुरू करावी, तसेच उपलब्ध जागेवर आणखी ओट्यांची उभारणी करून शहराला आधुनिक आणि नियोजित बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता व्यापारी, नागरिक आणि परिसरातील व्यावसायिकांकडून होत आहे.

